मुंबई: मुंबई महापालिकेच्या के/पश्चिम विभागातील परवाना विभागात कार्यरत तत्कालीन परवाना निरीक्षकाने ज्ञात उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती जमवल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) शुक्रवारी अटक केली.
विनाश शांतागम कांबळे असे आरोपीचे नाव असून, त्याच्याकडे ४५ लाख ८१ हजार ४६० रुपयांची बेहिशेबी मालमत्ता आढळल्याचा आरोप आहे.
कांबळे हे बृहन्मुंबई महापालिकेच्या अंधेरी पश्चिम येथील के/पश्चिम विभागातील वरिष्ठ निरीक्षक, परवाना कार्यालयात तत्कालीन परवाना निरीक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांच्याविरुद्ध यापूर्वी करण्यात आलेल्या कारवाईनंतर घेतलेल्या झडतीत काही बाबी समोर आल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने खुली चौकशी सुरू केली होती.
या चौकशीदरम्यान १७ जुलै १९९६ ते २३ डिसेंबर २०१९ हा संपत्ती तपासणीचा कालावधी निश्चित करण्यात आला. या कालावधीत कांबळे यांनी भ्रष्ट मार्गाने तसेच कायदेशीर उत्पन्नाच्या ज्ञात स्रोतांपेक्षा अधिक संपत्ती जमवल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्याचा दावा एसीबीने केला आहे.
त्यांच्या संपत्तीचे मूल्य ४५ लाख ८१ हजार ४६० रुपये असून, ज्ञात उत्पन्नाच्या तुलनेत ही संपत्ती २७.६५ टक्के अधिक असल्याचे आढळून आले.
या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मुंबई विभागाने भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ मधील कलम १३(१)(ब) आणि १३(२) अन्वये गुन्हा क्रमांक ३७/२०२६ दाखल केला आहे. शुक्रवारी त्यांना अटक करण्यात आली.