थर्टी फर्स्टच्या दिवशी मोठ्या प्रमाणात ऑर्डर्स असल्याने अनेक हॉटेल व्यावसायिक निकृष्ट दर्जाचे अन्न ग्राहकांच्या माथी मारत असतात. Pudhari News Network
मुंबई

Food and Drug Administration : हॉटेल, केक व्यावसायिकांवर अन्न-औषध प्रशासनाची करडी नजर

निकृष्ट अन्नपदार्थ बनवणाऱ्यांवर होणार तत्काळ कारवाई

पुढारी वृत्तसेवा

नवी मुंबई : थर्टी फस्ट उत्साहात साजरे करण्यासाठी अनेकांनी हॉटेल, रिसॉर्ट, चायनीज कॉर्नर, फॉर्म हाऊस या ठिकाणी बेत आखले आहेत. पण थर्टी फर्स्टच्या दिवशी मोठ्या प्रमाणात ऑर्डर्स असल्याने अनेक हॉटेल व्यावसायिक निकृष्ट दर्जाचे अन्न ग्राहकांच्या माथी मारत असतात. तर आता सेलिब्रेशन करण्यासाठी केक हा हमखास घेतला जातो. स्वस्तात केक देण्याची देखील स्पर्धा सुरु झाली आहे. या स्पर्धेत निकृष्ट दर्जाचे केक देखील बनवण्यात येत आहेत. थर्टी फर्स्ट व नुतन वर्षाच्या अनुषंगाने निकृष्ट दर्जाचे अन्न पदार्थ बनवणाऱ्या केक विक्रेते व हॉटेल व्यावसायिकांवर अन्न उत्पादन शुल्क विभागाची करडी नजर राहणार असून तत्काळ कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा कोकण विभाग सहआयुक्त अन्न औषध प्रशासन श्रीकांत करकाळे यांनी दिला आहे.

थर्टी फर्स्टच्या अनुषंगाने अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाचे अन्न बनवण्यात येते. हॉटेलमध्ये बसण्यासाठी रांगा लागतात. नागरिक दोन ते तीन तास वेटिंगवर असतात. त्यामुळे अन्न अर्धवट शिजवलेल्या अवस्थेत देण्यात येते. तर नॉनव्हेजमध्ये देखील चिकन किंवा मटणाच्या ठिकाणी दुसरेच मांस दिले जाते. बटरच्या ऐवजी डालडा वापरला जातो. निकृष्ट दर्जाचा माल वापरण्यात येतो. त्यामुळे अन्न औषध प्रशासनाने यावर करडी नजर ठेवली आहे.

अन्न व औषध प्रशासनाने दहा दिवसांपूर्वीच हॉटेल व्यावसायिकांना सूचना केल्या आहेत. हॉटेलमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्वचारोग आहे का, तेथील पाणी स्वच्छ आहे का याच्या तपासणीसह हॉटेलमध्ये पेस्ट कन्ट्रोल करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. तर थर्टी फर्स्टच्या अनुषंगाने खबरदारी म्हणून हॉटेल तसेच केक विक्रेत्यांची तपासणी करण्यास सुरुवात केली आहे. नागरिकांनी देखील उघड्यावरील अन्नपदार्थ न खाता परवाना असलेल्या व्यवसायिकांकडेच खावे. रंगाला देखील भूलून न जाता जीभेचे चोचले पुरवणारे पदार्थ खाणे टाळावे.
श्रीकांत करकाळे, सहआयुक्त, अन्न-औषध, कोकण विभाग

उघड्यावरील अन्नामुळे आजाराचा धोका

रस्त्यावर मिळणारे पदार्थ मोठ्या आचेवर तळले जातात. तेलाचा पुन्हा पुन्हा तळण्यासाठी केला जातो. ते त्याचा स्मोक-पॉइंट पार करते. ज्याच्यामुळे मुक्त रॅडीकल्स मोठ्या संख्येत सुटी होतात आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्या लोकांसाठी ती कॅन्सर निर्माण करणारी ठरतात. तेलाचा पुन्हा पुन्हा अनेकवेळा वापर केल्याने तेलात ट्रान्स फॅट वाढते. रस्त्यावरील खाद्यपदार्थात मैदा आणि साखर हे मुख्य घटक असतात. त्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स उच्च असल्याने या पदार्थांच्या अधिक सेवनाने अनियंत्रित मधुमेह, स्थूलता, कॅन्सर व इतर रोग होऊ शकतात.

उघड्यावरचे अन्नपदार्थ खाणेच चुकीचे आहे. तेथे निकृष्ट दर्जाचे पदार्थ, अशुद्ध पाणी वापरले जाते. शिवाय धुलीकणही पदार्थांवर बसतात. त्यात कोण-तेही पोषणमूल्य नसतात. त्यामुळे असे पदार्थ अपायकारक ठरू शकतात. त्यामुळे उघड्यावर खाणे टाळावे.
डॉ. प्रतीक तांबे, जनरल फिजिशअन

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT