मुंबई: सणासुदीच्या काळात नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या भेसळखोरांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने धडक मोहीम उघडली आहे. गेल्या दोन दिवसांत राज्यातील विविध ठिकाणी केलेल्या कारवाईत तब्बल ४ कोटी ४५ लाख रुपयांचा अन्नसाठा जप्त करण्यात आला आहे.
अहिल्यानगर, पुणे, नाशिक आणि बुलढाणा येथे करण्यात आलेल्या या कारवायांमध्ये संशयित बटर, पनीर, खवा, दही, बर्फी तसेच दुधाचा साठा जप्त करण्यात आला.
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली सणासुदीच्या पार्श्वभूमीवर विशेष तपासणी मोहीम सुरू आहे. जप्त करण्यात आलेल्या अन्नपदार्थांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले असून, अहवालानुसार पुढील कायदेशीर कारवाई आहे. अहिल्यानगरमधील एमआयडीसी परिसरातील अरिहंत कोल्ड स्टोअरेजवर १० सप्टेंबरच्या रात्री धाड टाकण्यात आली.
कमी दर्जाचे बटर असल्याच्या संशयावरून तसेच लेबलविषयक नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळल्याने ७५ हजार ३५६.८ किलो पाश्चराइज्ड कुकिंग बटरचा साठा जप्त करण्यात आला. या साठ्याची किंमत तब्बल ३ कोटी ९५ लाख ६२ हजार ३२० रुपये आहे. साठ्यातून नमुने घेऊन प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.
पुण्यात बुधवार पेठ परिसरात भेसळयुक्त पनीर, खवा आणि दही आणले जाणार असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती. त्यानंतर चार-पाच दिवस पाळत ठेवून ११ सप्टेंबरला दोन वाहनांची आणि के. बी. अगरवाल पेढीची तपासणी करण्यात आली.
या वाहनातील ७,३६२.५ किलो साठा, किंमत १७ लाख १५ हजार ६६४ रुपये, जप्त करण्यात आला. दुसऱ्या वाहनातून ६,०८१ किलो पनीर, किंमत १४ लाख ५५ हजार २९० रुपये, जप्त करण्यात आले. के. बी. अगरवाल पेढीतून ४,६२७ किलो खवा, किंमत ११ लाख ५६ हजार ७५० रुपये, जप्त करण्यात आला.
नाशिकमध्ये गुजरातहून आलेली बर्फी जप्त
नाशिकमध्ये गुजरातहून खासगी बसमधून अवैधरीत्या आणला जात असलेला २,१५५ किलो स्पेशल स्वीट बर्फीचा साठा अन्न व औषध प्रशासनाने जप्त केला. द्वारका परिसरात ११ सप्टेंबरला पहाटे श्री विजय आणि बलदेव या दोन खासगी बसमधून हा साठा आढळला. त्याची किंमत ५ लाख ५८ हजार २६७ रुपये आहे. अस्वच्छ वातावरण, तापमानाच्या अटींचे उल्लंघन आणि विनापरवाना वाहतूक झाल्याने साठा नष्ट करण्यात आला.
बुलढाण्यात विनापरवाना दूध संकलन केंद्र
बुलढाणा जिल्ह्यातील येरळी येथील मराठवऱ्हाड दूध उत्पादक संस्थेच्या संकलन केंद्राची तपासणी करण्यात आली. या केंद्राकडे नोंदणी प्रमाणपत्र नसल्याचे आढळले. तपासणीदरम्यान गाईचे १३९ लिटर आणि म्हशीचे ३३ लिटर दूध, असा एकूण १७२ लिटर दूधसाठा जप्त करून नष्ट करण्यात आला. या साठ्याची किंमत ७,९८३ रुपये आहे.