मुंबई : पुढारी वृत्तसमूहाच्या ‘पुढारी न्यूज’ या वृत्तवाहिनीच्या प्रथम वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त ‘पुढारी न्यूज महासमिट’चे उद्घाटन करताना केंद्रीय सहकार व नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह दैनिक ‘पुढारी’चे चेअरमन इमेरिटस व मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव आणि दैनिक ‘पुढारी’चे चेअरमन व समूह संपादक डॉ. योगेश जाधव.  Pudhari File Photo
मुंबई

मराठी वृत्तवाहिन्यांमध्ये ‘पुढारी न्यूज’ नावाप्रमाणेच पुढारी!

दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांचे गौरवोद्गार

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : निर्भीड पत्रकारितेचा वसा जपत ‘पुढारी न्यूज’ने वर्षभरात आपला वेगळा ठसा उमटवला आहे. मराठी वृत्तवाहिन्यांमध्ये आपले वेगळेपण सिद्ध करत आपले नाव खर्‍या अर्थाने सार्थ ठरवले. मराठी वृत्तवाहिन्यांमध्ये ‘पुढारी न्यूज’ नावाप्रमाणेच पुढारी ठरले, असे गौरवोद्गार दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी गुरुवारी काढले.

‘पुढारी न्यूज’च्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त ‘पुढारी न्यूज महासमिट’ कार्यक्रमाचे मुंबईतील कफ परेड येथील ‘हॉटेल प्रेसिडेंट’ येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. जाधव बोलत होते. या कार्यक्रमाचा शुभारंभ केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाला. यावेळी डॉ. जाधव यांच्या हस्ते राज्यमंत्री मोहोळ, चव्हाण यांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह आणि करवीरनिवासिनी श्री अंबाबाईची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी ‘पुढारी’ माध्यम समूहाचे चेअरमन, दै. ‘पुढारी’चे समूह संपादक डॉ. योगेश जाधव, ‘पुढारी न्यूज’चे कार्यकारी संपादक तुळशीदास भोईटे, दै. ‘पुढारी’ मुंबईचे कार्यकारी संपादक विवेक गिरधारी उपस्थित होते.

दै. ‘पुढारी’ आणि ‘पुढारी न्यूज’ हे वेगळे होऊ शकत नाहीत. ही दोन्ही एकच भावंडे आहेत. दै. ‘पुढारी’ मोठा भाऊ, तर ‘पुढारी न्यूज’ हे त्याचे लहान भावंड आहे. चॅनल चालवणे आणि ते यशस्वी करणे याची सर्वस्वी जबाबदारी डॉक्टर योगेश जाधव आणि त्यांच्या सहकार्‍यांवर दिली होती. ती त्यांनी यशस्वीपणे पार पाडली. डॉ. योगेश जाधव हे भविष्यातही काळाच्या पुढचा विचार करून, माध्यम क्षेत्राचा 360 अंशांत विस्तार करतील आणि यशाची विविध शिखरे पादाक्रांत करतील, असा विश्वास डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी व्यक्त केला.

कोल्हापूरच्या लाल मातीमुळे लढण्याची ताकद

प्रवाहाच्या विरोधात पोहणे हा कोल्हापूरच्या लाल मातीचा गुण आहे, असे सांगत डॉ. जाधव म्हणाले, पूर्वी प्रत्येक जिल्ह्यामध्ये वर्तमानपत्रे होती. मात्र, मुंबई-पुण्यातील साखळी वृत्तपत्रांच्या आक्रमणामुळे ती बंद पडत गेली. मात्र, येणारी ही सर्व आक्रमणे थोपवत दै. ‘पुढारी’ राज्यभर कधी पोहोचला ते कळले नाही.

पत्रकार म्हणून साठ वर्षे आणि संपादक म्हणून 55 वर्षांची आपली कारकीर्द. या कारकिर्दीत अनेक स्थित्यंतरे बघितली. अनेक बदल बघितले. या सर्वांना सामोरे जात दै. ‘पुढारी’ने निर्भीड पत्रकारिता निर्माण केली. पत्रकारितेत राहूनही सामाजिक काम कसे करता येते हे आपण दाखवून दिले. सीमा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक त्रिशताब्दी सोहळा, शेतकरी आंदोलन, टोल आंदोलन, मराठा आंदोलन अशा प्रत्येक सामाजिक चळवळीत दै. ‘पुढारी’ अग्रणी राहिला. केवळ संपादक म्हणून खोलीत काम करण्यापेक्षा, रस्त्यावर उतरून सर्वसामान्यांसाठी चळवळ करायला आपल्याला आवडते, असेही डॉ. जाधव यांनी सांगितले.

‘पुढारी’ची सामाजिक बांधिलकी खूप मोठी आहे, असे सांगत डॉ. जाधव म्हणाले, गुजरातचा भूकंप असेल किंवा सियाचीनमधील सर्वाधिक उंचीवरील रणभूमीवर सैनिकांसाठी उभारलेले रुग्णालय असेल, त्याचीच प्रचिती देत आहेत. तत्कालीन संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांनी तर ‘पुढारी’ने उभारलेले सियाचीनमधील हे हॉस्पिटल म्हणजे भारतीय जवानांसाठी संजीवनी आहे, असे गौरवोद्गार काढल्याची आठवण डॉ. जाधव यांनी सांगितली.

पत्रकारिता आजही लोकशाहीचा चौथा स्तंभ

ज्ञान-विज्ञानाचा विस्फोट झाला आहे. जग हे वैश्विक खेडे बनले आहे. यामुळे बदलाची जाणीव घेऊनच पावले टाकावी लागतील, असे सांगत डॉ. जाधव म्हणाले, स्वातंत्र्यपूर्व काळात ध्येयवादी पत्रकारिता होती. आता ती आहे की नाही हे माहीत नाही. पत्रकारितेमध्ये अनेक स्थित्यंतरे होत आहेत. पत्रकारितेचे स्वरूपही बदलत चालले आहे. मात्र, पत्रकारितेचा आत्मा बदललेला नाही, हे सर्वांनीच लक्षात ठेवले पाहिजे. तंत्रज्ञान कितीही बदलले असले, तरी प्रसारमाध्यमे ही या जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा आधारस्तंभ आहेत. त्याला आपण चौथा स्तंभही म्हणतो. यामुळेच लोकशाही वाचवायची माध्यमांवरील जबाबदारी वाढली आहे, असेही डॉ. जाधव यांनी यावेळी सांगितले.

‘पुढारी’ची समृद्ध परंपरा

‘पुढारी’ परिवाराला समृद्ध परंपरा, पत्रकारितेचा मोठा वारसा असल्याचे सांगत डॉ. जाधव म्हणाले, ‘पुढारी’चे संस्थापक संपादक पद्मश्री कै. डॉ. ग. गो. जाधव यांनी महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, प्रबोधनकार ठाकरे, अच्युतराव कोल्हटकर, मामा वरेरकर, जेधे, जवळकर अशा महान व्यक्तींसमवेत काम केले. मुंबईतच ‘सेवक’ आणि ‘कैवारी’ ही वर्तमानपत्रे चालवली. मात्र, स्वातंत्र्यलढ्यात ते भूमिगत झाले. त्यानंतर कोल्हापूर येथे 1937 साली ‘पुढारी’ हे साप्ताहिक सुरू केले. 1939 पासून दैनिक ‘पुढारी’ सुरू झाले. ‘पुढारी’चा रौप्य महोत्सव झाला, त्यावेळी मी कॉलेजमध्ये होतो. सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या कार्यक्रमाला तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी उपस्थित राहिले. हीरक महोत्सव गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या उपस्थितीत झाला. अमृतमहोत्सवी कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झाला. दैनिकाच्या कार्यक्रमासाठी दोन वेळेला तत्कालीन पंतप्रधानांनी उपस्थिती लावली असे दै.‘पुढारी’ हे देशातील एकमेव दैनिक असल्याचेही डॉ. जाधव यांनी सांगितले.

डिजिटल क्षेत्रात भारताची कौतुकास्पद कामगिरी

डिजिटल क्षेत्रात भारताची कामगिरी कौतुकास्पद वाटते, असे सांगत डॉ. जाधव म्हणाले, देशात दहा कोटी नोंदणीकृत प्रकाशने आहेत. 40 कोटी लोक ‘व्हॉटस्अ‍ॅप’, तर 26 कोटी लोक ‘फेसबुक’ वापरतात. सध्या बंदी असलेला ‘टिकटॉक’ वीस कोटी लोक वापरत होते. आठ कोटी लोक ‘इन्स्टाग्राम’वर आहेत; तर 30 कोटी लोक ‘टेलिग्राम’वर असल्याचेही डॉ. जाधव यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT