मुंबई : मुंबईच्या महापौरपदावरून भाजप आणि शिवसेना शिंदे गटात रस्सीखेच सुरू असल्याची चर्चा असतानाच, देश-विदेशातून गुंतवणूक महाराष्ट्रात आणणारे करार करण्यासाठी दावोस मुक्कामी असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन लावला. दोन्ही नेत्यांत प्रदीर्घ चर्चा झाली. महापौरपदावरून रंगलेल्या उलटसुलट चर्चांना मुख्यमंत्र्यांनी पूर्णविराम दिला. महायुतीचाच महापौर होणार, असा पुनरुच्चार करत उपमुख्यमंत्री शिंदे यांनीही नव्या राजकीय समीकरणाची चर्चा फेटाळून लावली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या जागतिक आर्थिक परिषदेसाठी स्वित्झर्लंडमधील दावोस शहराच्या दौर्यावर आहेत. तेथे मोठ्या गुंतवणुकीचे करारमदार करण्यापूर्वीच मुख्यमंत्र्यांनी थेट फोन लावत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संवाद साधला. या चर्चेत दोन्ही नेत्यांनी महापौरपदाबाबत सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम देण्याचा आणि दावोस दौर्यानंतर मुंबईत एकत्र बसून या मुद्द्यावर तोडगा काढण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. शिंदे गटाच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा मुक्काम सध्या वांद्रे येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये आहे. मुंबई पालिका निवडणुकीचा निकाल लागताच या नगरसेवकांना या पंचतारांकित तळावर हलवण्यात आले.
पालिकेतील संख्याबळ पाहता, शिंदे गटाच्या पाठिंब्याशिवाय भाजपचा महापौर बसू शकत नाही. त्यामुळे अडीच वर्षांसाठी महापौरपद, तसेच समित्या पदरात पाडून घेण्यासाठी शिंदे गटाचे नगरसेवक हॉटेल मुक्कामी असल्याची चर्चा आहे. दुसरीकडे, शिंदे गटाचे नगरसेवक फुटण्याचा धोका असल्याने हॉटेल मुक्कामाचा घाट घालण्यात आल्याचे दावेही केले जात आहेत. यावरून राजकीय शक्यता आणि तर्कवितर्कांचे पेव मात्र फुटले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर फडणवीस आणि शिंदे यांच्यातील चर्चा महत्त्वाची मानली जात आहे.
मुख्यमंत्री सध्या दावोस दौर्यावर असून, तेथून ते परतल्यानंतर मुंबईच्या महापौरपदाबाबत शिंदे-फडणवीस यांच्यात बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महापौरपदासाठी भाजपने ठाकरे गटाशी संधान साधल्याच्या वावड्या मुंबईत उठल्या आहेत. त्यात कोणतेही तथ्य नाही. यासंदर्भातील चर्चा गैरलागू असल्याचे फडणवीस-शिंदे यांच्या चर्चेतून निष्पन्न झाले. मुंबईकरांनी महायुतीवर दाखवलेल्या विश्वासाला तडा जाईल, असे कोणतेही कृत्य कोणत्याही पक्षाकडून होणार नाही, अशी हमी दोन्ही नेत्यांनी दिल्याची माहितीही सूत्रांनी दिली.