मुंबई : दक्षिण मुंबईतील बॅलार्ड पीअर परिसरात सक्तवसुली संचालनालयाचे (ईडी) कार्यालय असलेल्या कैसर हिंद इमारतीला रविवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागण्याची घटना घडली. यात कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी ईडी कार्यालयातील महत्त्वाच्या कागदपत्रांचे नुकसान झाल्याची शक्यता आहे. तथापि याबाबत ईडीने कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण दिलेले नाही. दुपारी 12 वाजेपर्यंत अग्निशमन दलाच्या 10 गाड्यांनी या आगीवर नियंत्रण मिळवले.
कैसर हिंद इमारतीचे भूमिगत 4 मजले, तळमजला आणि त्यावरील 4 मजले या ठिकाणी आग मोठ्या प्रमाणावर पसरली होती. कार्यालयातील लाकडी फर्निचर आणि इतर वस्तूंमुळे आग पसरल्याचे सांगण्यात येते. आगीचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र, या इमारतीमधील कार्यालयांचे नुकसान झाल्याची माहिती पुढे आली आहे.