Jitendra Awhad FIR Pudhari Photo
मुंबई

Jitendra Awhad FIR: आव्हाडांच्या अडचणीत भर, आंदोलनाप्रकरणी मुंबईत गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याच्या आरोपाखाली आज (दि.१८) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरूवारी (दि.१७) रात्री घडलेल्या घटनेनंतर मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली. मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात या प्रकरणाची नोंद झाली आहे.

विधिमंडळ परिसरात काय घडलं? 

काही दिवसांपूर्वी आव्हाड यांनी विधानभवनात प्रवेश करत असताना पडळकर यांचे नाव न घेता मंगळसूत्र चोराचा...मंगळसूत्र चोराचा.. अशी घोषणाबाजी करत पडळकरांना डिवचले होते. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरलही झाला होता.. याच व्हिडिओवरून विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर आव्हाड-पडळकर यांच्यात वाद झाला. पडळकर आपल्या वाहनातून उतरत असताना तिथे आव्हाड उभे होते. त्यामुळे पडळकरांनी गाडीचा दरवाजा जोरात ढकलला. त्यावर मुद्दाम हा दरवाजा जोरात ढकलला आणि तो मला लागल्याचा आरोप आव्हाड यांनी केला. यावरून या दोघांमध्ये आधी शाब्दिक चकमक झाली. हे प्रकरण आणखी तापले आणि एकमेकांना शिवीगाळ करण्यापर्यंत प्रकरण गेले.

नेमकं प्रकरण काय आहे? 

गुरुवारी सायंकाळी विधानभवनाच्या लॉबीत आव्हाड यांचे कार्यकर्ते नितिन देशमुख आणि पडळकर यांचे कार्यकर्ते ऋषिकेश टकले यांच्यात सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची झाली. या कार्यकर्त्यांचा आवाज चढत गेला. शरद पवार यांच्या बद्दल आमदार पडळकर बोलले तर बघून घेऊ, असे आव्हाड यांचा कार्यकर्ता बोलत होता. तर त्यावर पडळकर यांचा कार्यकर्ता टकले आव्हाडाविरोधात बोलला. आम्ही कोणाला घाबरत नाही. असे तो ओरडून सांगत होता. यावेळी तेथे गर्दी जमली. त्यात हे दोघे कार्यकर्ते परपरांच्या अंगावर गेले. यात आव्हाड यांच्या कार्यकर्त्याचा शर्ट फाडला गेला. या दोघांना दोन्ही बाजूने त्यांचे कार्यकर्ते मागे खेचत होते. तेव्हा विधानभवनाचे सुरक्षारक्षक धावून आले. त्यांनी या दोघांना पकडले.

आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचे पोलीस ठाण्यासमोरही आंदोलन

गुरुवारी रात्री उशिरा पोलिसांनी नितिन देशमुख आणि ऋषिकेश टकले या दोघांना पोलीस ठाण्यात नेले. यावेळी आव्हाड आक्रमक झाले आणि त्यांनी पोलिसांना रोखण्याचा प्रयत्न केला. मारहाण करणाऱ्यांऐवजी पोलीस मार खाणाऱ्यांना तुरुंगात डांबत आहे, असा आव्हाडांचा आरोप होता. आव्हाडांनी पोलिसांच्या गाडी समोरच ठिय्या मांडला होता. शेवटी पोलिसांनी फरफटत आव्हाडांना बाजूला केले होते. यानंतर आव्हाड आणि त्यांचे कार्यकर्ते पोलीस ठाण्यासमोरही आंदोलन करत होते. याच प्रकरणी आव्हाडांविरोधात पोलिसांनी शुक्रवारी दुपारी गुन्हा दाखल केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT