मुंबई

मोदी सरकारने भारत दहशतवादमुक्त ठेवला : निर्मला सीतारामन

दिनेश चोरगे

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : गेल्या 9 वर्षांत देशाला दहशतवादापासून मुक्त करण्याचे मोठे काम केेंद्रातील मोदी सरकारने केले आहे. त्याआधी देशभरात फुटीरवादी शक्ती बॉम्बस्फोट घडवत होत्या. राजकीय इच्छाशक्तीच्या जोरावर मोदी सरकारने हे करून दाखविले. समाजातील सर्वच घटकांसाठी लक्षणीय कामगिरी केल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले. देशातील गोरगरीब, वंचित, शोषित वर्गालाही विकासाच्या मुख्य प्रवाहात आणून सर्वसमावेशक विकासाचा नवा मापदंड तयार केल्याचेही त्या म्हणाल्या.

मोदी सरकारच्या नऊ वर्षांतील कामगिरीचा लेखाजोखा मांडण्यासाठी भाजपने महाजनसंपर्क अभियान सुरू केले आहे. या अभियानाचाच एक भाग म्हणून निर्मला सीतारामन यांनी सोमवारी मुंबईत पत्रकार परिषद घेतली होती. मोदी सरकारने जागतिक पातळीवर भारताची प्रतिष्ठा उंचावण्याचे काम केले. गरिबांना पक्की घरे, शौचालय, विनामूल्य अन्नधान्य दिले. उज्ज्वला योजनेसारख्या अनेक योजनांनी महिलांच्या आयुष्यात परिवर्तन घडवून आणले, असे सीतारमन म्हणाल्या.

आमच्या कार्यकाळात विमानतळे, द्रूतगती महामार्ग, आयआयएम, एम्स्, आयआयटी यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
कोरोना प्रतिबंधक लसीचे 220 कोटी डोस मोफत दिले. या काळात जगभरात अडकलेल्या लाखो भारतीयांना मायदेशी सुखरूप परत आणले गेले. मोदी सरकारच्या कामगिरीमुळेच भारताची अर्थव्यवस्था जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनली आहे, असेही त्यांनी नमूद केले. दोन हजाराच्या नोटा चलनातून मागे घेण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेने घेतला आहे. अर्थमत्री राहिलेल्या चिदंबरम यांनी त्यावरून टीका करताना याचे भान बाळगले पाहिजे, असा पलटवार त्यांनी केला.

SCROLL FOR NEXT