मुंबईत ठाकरे-शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांत राडा झाला.  
मुंबई

मुंबईत ठाकरे-शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांत राडा

Maharashtra Assembly Election : जोगेश्वरी येथे मध्यरात्री तुंबळ हाणामारी; गुन्हे दाखल

पुढारी वृत्तसेवा

मुंबई ः राज्यात निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप होत असताना मंगळवारी मध्यरात्री जोगेश्वरी परिसरात वस्तू वाटत असल्याच्या संशयावरून ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाल्याचे पाहायला मिळाले. मातोश्री क्लबमध्ये काही वस्तू वाटत असल्याचा संशय आल्यामुळे ठाकरे गटाचे काही कार्यकर्ते महिलांचे व्हिडीओ काढत असताना दोघांत बाचाबाची झाली. त्यानंतर शिवसेना शिंदे आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते एकमेकांशी भिडले. त्यामुळे मोठा तणाव निर्माण झाला.

या घटनेची माहिती मिळताच पोलिस पथक आणि दंगलविरोधी पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने परिस्थिती नियंत्रणात आणली. ठाकरे गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने मातोश्री क्लबबाहेर जमले होते. यावेळी मोठ्या प्रमाणात दगडफेक केल्याचा आरोप शिंदे आणि ठाकरे गटांनी परस्परांवर केला. जोगेश्वरीतील ठाकरे गटाचे उमेदवार अनंत (बाळा) नर यांची मतदारसंघात गुंडगिरी सुरू असून, मंगळवारी रात्री दोनशे कार्यकर्त्यांसह दगडफेक करून दंगल घडवल्याचा गंभीर आरोप शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला. नर यांच्यावर कठोर कारवाईची मागणी त्यांनी पोलिस आणि निवडणूक आयोगाकडे केली.

खा. वायकर यांच्या पत्नी मनीषा जोगेश्वरी पूर्व मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार आहेत. या मतदारसंघात नर यांच्याकडून मतदारांना धमकावले जात आहे, असा आरोप वायकर यांनी केला. ते म्हणाले, मंगळवारी रात्री नर हे दीडशे कार्यकर्ते घेऊन आले आणि त्यांनी शिवीगाळ केली. त्यांच्या कार्यकर्त्यांनी महिलांचा व्हिडीओ काढण्याचा प्रयत्न केला. त्यांना अटकाव करण्याचा प्रयत्न केला असता, व्हिडीओ काढणार्‍यांनी महिलांचे कपडे फाडले. यावेळी नर यांच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली आणि विनयभंग केला, असाही गंभीर आरोप वायकर यांनी केला. नर यांचा कार्यकर्ता अमित पेडणेकर याने वायकर जर ठाकरेंविरुद्ध बोललात तर जीभ छाटली जाईल, अशी खुलेआम धमकी जाहीर सभेत दिली, असाही आरोप वायकर यांनी केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT