PAT Exam : पॅट परीक्षेच्या पर्यवेक्षणाची जबाबदारी चक्क शिपाई महिलेवर (Pudhari File Photo)
मुंबई

PAT Exam : पॅट परीक्षेच्या पर्यवेक्षणाची जबाबदारी चक्क शिपाई महिलेवर

विद्यार्थ्यांच्या भविष्यावर खेळ मांडणारा गंभीर प्रकार

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत 6 ते 8 ऑगस्टदरम्यान पॅट परीक्षा 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी घेण्यात येत आहे. याच कालावधीमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने नवनियुक्त शिक्षकांसाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले होते. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या मानखुर्द, गोवंडी या परिसरातील शाळांमध्ये परीक्षेच्या पर्यवेक्षणासाठी शिक्षकच उपलब्ध नसल्याने पर्यवेक्षणाची जबाबदारी चक्क शिपाई महिलेवर सोपवण्यात आली होती. पॅट परीक्षेच्या दरम्यान विद्यार्थ्यांच्या भविष्यावर खेळ मांडणारा गंभीर प्रकार समोर आला आहे.

राज्यातील शिक्षणपद्धतीचे अध्यापन, अध्ययन व परिणाम यांचे बळकटीकरण (स्टार्स) या केंद्र सरकार पुरस्कृत प्रकल्पांतर्गत इयत्ता तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी नियतकालिक मूल्यांकन चाचण्यांचे (पॅट) आयोजन करण्यात येते. त्यानुसार प्रथम भाषा, तृतीय भाषा (इंग्रजी) आणि गणित या तीन विषयाच्या परीक्षा बुधवारपासून परिषदेमार्फत घेण्यात येत आहे. मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाअंतर्गत पवित्र पोर्टलच्या माध्यमातून नियुक्त केलेल्या 885 शिक्षणसेवकांसाठी 21 जुलै ते 6 ऑगस्ट याच कालावधीत प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले होते. शिबिराच्या अखेरच्या दिवशी 6 ऑगस्ट रोजी पॅट परीक्षेला सुरुवात झाली.

पहिल्या दिवशी प्रथम भाषा म्हणजेच मराठी विषयाची परीक्षा होती. त्याचदिवशी मानखुर्द व गोवंडी या परिसरातील शाळांमध्ये नियुक्त शिक्षक प्रशिक्षणामध्ये सामील झाले होते. मात्र मुंबई महानगरपालिकेने या परीक्षेसाठी प्रशिक्षण पुढे न ढकलता कायम ठेवले. परिणामी मानखुर्द व गोवंडीमधील अनेक शाळांमध्ये परीक्षेच्या पर्यवेक्षकासाठी शिक्षकच उपलब्ध नव्हते. त्यामळे काही शाळांमधील मुख्याध्यापकांनी स्वत: पर्यवेक्षणाची जबाबदारी पार पडली, तसेच शिक्षकांची कमतरता असल्याने सहावी व सातवीच्या वर्गातील परीक्षेची जबाबदारी शाळेतील शिपाई महिलांकडे सोपवल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.

नवनियुक्त शिक्षक प्रशिक्षणासाठी गेले असले तरीही परीक्षा ही पूर्ण दिवस नसल्याने पर्यवेक्षणासाठी शालेय पातळीवर नियोजन करणे आवश्यक होते. मात्र ते का झाले नाही, याची माहिती संबंधित अधिकार्‍यांकडून घेण्यात येईल, असे पालिकेच्या शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT