मुंबई : ‘सुरक्षित अन्न, सुरक्षित महाराष्ट्र’ अभियानांतर्गत अन्न व औषध प्रशासनाने राज्यभर दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या गुणवत्तेची तपासणी सुरू केली आहे. या विशेष मोहिमेत ७ हजार ३३२ लिटर दूध, १०४ किलो दही आणि ८८.४ किलो क्रीम जप्त करण्यात आले. जप्त केलेल्या दूध व दुग्धजन्य पदार्थांची एकूण किंमत २ लाख ५५ हजार ५९२ रुपये आहे.
नवी मुंबईतील रबाळे येथील नारायण डेअरीची तपासणी करण्यात आली. तेथे ३ हजार ६४८ लिटर प्रमाणित पाश्चराइज्ड स्किम्ड दूध आढळून आले. सुमारे १ लाख २४ हजार ३२ रुपये किमतीचे हे दूध घटनास्थळीच नष्ट करण्यात आले. नवी मुंबईतील आणखी एका दूध संघाच्या ठिकाणी ८८.४ किलो क्रीम आढळले. हे क्रीम अवमानक असल्याचा संशय प्रशासनाला आला असून अन्न सुरक्षा व मानके अधिनियमातील तरतुदीनुसार पुढील कारवाई सुरू करण्यात आली आहे.
पुण्यात ३ हजार ३७० लिटर दुधावर कारवाई
पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील मौली मिल्क अँड ॲग्रो प्रॉडक्ट्स येथे ३ हजार ३७० लिटर गायीचे दूध तपासण्यात आले. या साठ्याची किंमत १ लाख ३१ हजार ५६० रुपये आहे. तपासणीदरम्यान करण्यात आलेल्या आम्लता चाचणीत नमुना दोषपूर्ण आढळला. त्यामुळे हे दूध अवमानक असल्याचा संशय व्यक्त करून पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
१०४ किलो दही अवमानक?
सांगलीतील फत्तेसिंगराव नाईक सहकारी दूध उत्पादक संघाच्या तपासणीत १०४ किलो दही आढळून आले. हे दही अवमानक असल्याचा संशय असून, उत्पादनाच्या लेबलवरही त्रुटी आढळल्या आहेत.
गायीच्या दुधातील क्रीम म्हशीच्या दुधात मिसळल्याचा संशय
सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील मायाक्का दूध संकलन केंद्राची तपासणी करण्यात आली. तेथे १७८ लिटर कच्चे गायीचे दूध, ९८ लिटर कच्चे म्हशीचे दूध आणि ३८ लिटर स्किम्ड दूध आढळून आले. दूध संकलनाच्या आवश्यक नोंदी उपलब्ध नसल्याचेही निदर्शनास आले. गायीच्या दुधापासून क्रीम वेगळे करून ते म्हशीच्या दुधात मिसळले जात असल्याचा संशय प्रशासनाने व्यक्त केला आहे.