मुंबई : माझगाव परिसरात राहणाऱ्या एका फॅशन डिझायनरला बिष्णोई टोळीकडून धमकी देण्यात आली आहे. अपूर्वा नावाच्या महिलेचे ५५ लाख रुपये सात दिवसांत परत कर नाहीतर परिणाम वाईट होतील, अशी धमकी देण्यात आली आहे.
याप्रकणी शिवडी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. या गुन्ह्याचा गुन्हे शाखेकडून संमातर तपास सुरु आहे. ४२ वर्षांचे तक्रारदार फॅशन डिझायनर असून ते सध्या माझगाव डॉक परिसरात कुटुंबियांसोबत राहतात. ३० ऑगस्टला त्यांना एका अज्ञात मोबाईल क्रमांकावरून कॉल आला होता. समोरील व्यक्तीने तो बिष्णोई टोळीकडून बोलत असल्याचे सांगून त्याच्याकडून अपूर्वा यांचे त्याला ५५ लाख रुपये देणे बाकी आहे. सात दिवसांत ही रक्कम देऊन टाक, सात दिवसानंतर पैसे दिले नाहीतर परिणाम वाईट होतील. आमच्या नादी लागू नकोस, चांगल्या घरातील व्यक्ती आहे, त्यामुळे तुला सात दिवसांची मुदत देतो. तुला तुझ्या जिवाची पर्वा आहे ना. त्यामुळे लवकरच अपूर्वाशी बोलून घे, अशी धमकी दिली होती. सुरुवातीला त्यांनी या धमकीकडे दुर्लक्ष केले. मात्र नातेवाईकांसह मित्रांना याबाबत सांगितल्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार करण्याचा निर्णय घेतला. अखेर मंगळवारी त्यांनी घडलेला प्रकार शिवडी पोलिसांना सांगून खंडणीसाठी धमकी देणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार दाखल केली होती.