समृद्धी महामार्ग Pudhari File Photo
मुंबई

Samruddhi Highway | समृद्धी महामार्गाद्वारे शेतकर्‍यांनी साधली उन्नती

मोबदल्याची रक्कम गुंतवली जमीन, कृषिपूरक व्यवसायांत

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : नागपूर ते मुंबई हा 701 किमी लांबीचा महाराष्ट्र समृद्धी महामार्ग राज्यातील पायाभूत सुविधांमध्ये पथदर्शी प्रकल्प ठरला आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने पूर्णत्वास नेलेल्या या प्रकल्पात दहा जिल्ह्यांतील सुमारे 16 हजार शेतकर्‍यांची 8 हजार 311 एकर जमीन आठ महिन्यांच्या विक्रमी वेळेत अधिग्रहित करण्यात आली.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने थेट खरेदी पद्धतीने (डीपीएस) शेतकर्‍यांकडून जमिनी घेतल्या. त्याचवेळी शेतकर्‍यांना मिळालेल्या मोबदल्याचे त्यांनी कसे नियोजन करावे, यासंदर्भात वेळोवेळी मार्गदर्शन शिबिरेही आयोजित केली. त्यातून शेतकर्‍यांनी त्यांना मिळालेल्या पैशांची सुनियोजित पद्धतीने गुंतवणूक केल्याचे अधोेरेखित झाले आहे.

अलीकडेच करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून ही बाब समोर आली. नागपूर, वर्धा, अमरावती, बुलडाणा, वाशिम, जालना, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, नाशिक आणि ठाणे या दहा जिल्ह्यांतील एकूण 6 हजार 400 शेतकर्‍यांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यापैकी 38 टक्के शेतकर्‍यांनी शेतजमिनीतच पैसा गुंतवला. सहा टक्के शेतकर्‍यांनी कृषिपूरक व्यवसायात म्हणजे ट्रॅक्टर, बैलगाडी खरेदी, शेतात विहिरी खोदणे, सूक्ष्म सिंचन, शेतीला कुंपण घालणे इत्यादीत गुंतवणूक केली. दहा टक्के शेतकर्‍यांनी डेअरी, पोल्ट्री फार्म, किराणा यात गुंतवणूक केली. सोबतच, 45 टक्के शेतकर्‍यांनी म्युच्युअल फंड, फिक्स डिपॉझिट, प्रवासी वाहनांची खरेदी, घरबांधणी वा प्लॉट खरेदी यात गुंतवणूक केली.

कर्जे फेडली, मुलांच्या शिक्षणासाठीही तरतूद

छत्रपती संभाजीनगर, बुलडाणा, वर्धा, अमरावती, जालना आणि नागपूर जिल्ह्यांतील अनेक शेतकर्‍यांनी या संधीचा उत्तम फायदा घेतला. काहींनी आधुनिक शेतीसाठी ट्रॅक्टर, पंपसेट, ठिबक सिंचन व्यवस्था विकत घेतली. त्यामुळे त्यांचे उत्पन्न पूर्वीपेक्षा दुपटीने वाढले. एका शेतकर्‍याने आपली दोन एकर शेती प्रकल्पासाठी दिली. काही शेतकर्‍यांनी आपले बँक कर्ज फेडून आर्थिक दिलासा मिळविला. तसेच काहींनी मुलांच्या शिक्षणासाठी आणि विवाहासाठी आर्थिक तरतूद केल्याचे निदर्शनास आले.

पेट्रोल पंप, दुकाने अन् गोडाऊन

समृद्धी महामार्गालगतच्या परिसरात जमिनींच्या किमती झपाट्याने वाढल्यामुळे स्थावर मालमत्तेचे मूल्य दुप्पट-तिपटीने वाढल्याचेही अहवालात म्हटले आहे. भरपाईतून मिळालेल्या रकमेत काहींनी व्यवसाय सुरू केले, पेट्रोल पंप, गोडाऊन, किरकोळ दुकाने अशा उपक्रमांना सुरुवात केली. यामुळे ग्रामीण भागात रोजगारनिर्मितीला मोठी चालना मिळाली.

ग्रामीण अर्थव्यवस्थेला झळाळी

तज्ज्ञांच्या मते, महामार्ग पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यामुळे वाहतूक सुलभता, शेतमालाला जलद बाजारपेठ उपलब्ध होणे, पर्यटन आणि औद्योगिक विकास या माध्यमातून ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाची कवाडे खुली होऊ लागली आहेत. साहजिकच समृद्धी महामार्ग केवळ प्रवास सुलभ करणारा नसून ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवा वेग देणारा आणि शेतकर्‍यांच्या जीवनात सुबत्ता आणणारा मार्ग ठरत चालला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT