मुंबई : लाडक्या भक्तांची दहा दिवसांची मनोभावे सेवा स्वीकारून देवी परतीच्या प्रवासाला आज निघणार आहेत. पुढच्या वर्षी परत येण्याचे आमंत्रण देऊन भाविक त्यांना निरोप देणार आहेत. यासाठी विसर्जनस्थळी मुंबई महानगरपालिकेने जय्यत तयारी केली आहे.
सोमवारपासून रात्री 12 वाजेपर्यंत परवानगी मिळाल्याने गरबा, दांडियांचा रंग चांगलाच चढला होता. बुधवारी शहरात सर्वत्र गरब्याचे मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आले होते. भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. या वर्षी भक्तांना दहा दिवस देवीची मनोभावे पूजा करण्याची संधी मिळाली असून लाडक्या देवींना निरोप दिला जाणार आहे. मुंबई महानगरपालिकेने लहान देवींच्या मुर्तींच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलाव बनवले आहेत. तर मंडळांच्या मोठ्या देवींच्या विसर्जनासाठी गिरगाव, दादर, जुहू, सात बंगला, वाढण्यास चौपाटीसह तलाव क्षेत्रामध्ये विसर्जनाची व्यवस्था केली आहे.
देवीचे विसर्जन निर्विघ्न पार पडावे यासाठी संपूर्ण समुद्रकिनार्यालगत जीव रक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. पालिकेचे अधिकारी व कर्मचारीही तैनात राहणार आहेत. पोलिसांचाही बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. त्याशिवाय समुद्रावर सर्च लाईट, रुग्णवाहिका अग्निशमन दल, वैद्यकीय पथक तैनात राहणार आहे.