Fraud Pudhari
मुंबई

Fake DCP Fraud: बोगस डीसीपींनी केली कोट्यवधींची फसवणूक; गुन्हे शाखेकडून तीन गुन्ह्यांचा तपास

राजस्थानातील जयपूर येथून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: स्वतःला उच्चपदस्य पोलीस अधिकारी (डीसीपी) म्हणून भासवून बनावट शासकीय ओळखपत्रे, पोलीस लिहिलेल्या वाहनांच्या नेमप्लेट आणि खोट्या प्रभावाचा वापर करून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळीविरोधात मुंबईत तीन गुन्हे दाखल झाले असून, मुंबई गुन्हे शाखेचा तपास अधिक व्यापक केला आहे.

आधी नोंद झालेल्या गुन्ह्याच्या तपासादरम्यान आणखी दोन फसवणुकीची प्रकरणे समोर आली असून, राजस्थानातील जयपूर येथून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.

मुंबई पोलीस आयुक्तालयात शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त राज तिलक रोशन यांनी या प्रकरणाची सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितले की, आरोपी स्वतःला उच्चपदस्य पोलीस अधिकारी म्हणून सांगून नागरिकांचा विश्वास संपादन करत होते.

बनावट शासकीय ओळखपत्रे, 'पोलीस' लिहिलेल्या वाहनांच्या नेमप्लेट, तसेच शासकीय व पोलीस यंत्रणेत प्रभाव असल्याचे भासवून त्यांनी विविध आमिषे दाखवत नागरिकांची फसवणूक केली असल्याचे तपासात उघड झाले आहे.

पहिल्या गुन्ह्याचा तपास सुरू असतानाच आणखी दोन स्वतंत्र गुन्हे उघडकीस आले असून, आणखी काही पीडित पुढे येण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी अशा प्रकारची फसवणूक झाल्यास तातडीने गुन्हे शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहनही राज तिलक रोशन यांनी केले.

गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कक्ष-१ मध्ये २६ जून रोजी दाखल झालेल्या पहिल्या गुन्ह्यात मोहम्मद गौस इब्राहिम खतिब ऊर्फ डॉ. राज खतिब (वय ५२) याच्यासह तिघांना अटक करण्यात आली होती.

आरोपी स्वतःला डीसीपी पोलीस अधिकारी असल्याचे भासवून बँक कर्ज मंजूर करून देण्याचे आमिष दाखवत नागरिकांकडून लाखो रुपये उकळत असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते.

या तपासादरम्यान आणखी एका तक्रारदाराने पुढे येत आरोपींनी शासकीय विभागांमध्ये प्रभाव असल्याचे भासवून अडकलेली रक्कम व्याजासह परत मिळवून देण्याचे, तसेच एका गृहनिर्माण प्रकल्पात फ्लॅट मिळवून देण्याचे आश्वासन दिल्याची तक्रार केली.

या बहाण्याने रोख रक्कम, विविध बँक खात्यांमधून पैसे तसेच अॅपल कंपनीचा मोबाईल स्वीकारून एकूण १५ लाख ९० हजार ५३२ रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणात राजेश बडेसिंग चौधरी (वय ४६) याला जयपूर येथून ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.

दरम्यान, पहिल्या गुन्ह्याबाबतची बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर आणखी एक तक्रारदार गुन्हे शाखेकडे पोहोचला होता.

आरोपींनी पोलीस खात्यात भरती करून देण्याचे आमिष दाखवत तीन तरुणांच्या नोकरीसाठी १२ लाख रुपये घेतल्याचा आरोप त्यांनी तक्रारीतून केला आहे. या तक्रारीवरून स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याचा तपास गुन्हे शाखेच्या कक्ष-३ कडून सुरू आहे.

खात्री करूनच आर्थिक व्यवहार करण्‍याचे आवाहन

आरोपींच्या आर्थिक व्यवहारांची, बँक खात्यांची, मोबाईल डेटाची, बनावट कागदपत्रांची आणि टोळीतील इतर साथीदारांची चौकशी सुरू आहे. तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतशी आणखी फसवणुकीची प्रकरणे उघड होण्याची शक्यता असून, नागरिकांनी कोणत्याही व्यक्तीच्या शासकीय ओळखीची खात्री करूनच आर्थिक व्यवहार करावेत, असे आवाहन त्यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT