मुंबई : कंपन्यांकडून अनिवार्यपणे दिल्या जाणाऱ्या कॉर्पोरेट सामाजिक दायित्वाच्या (सीएसआर) निधीचा कथित गैरवापर करून सुमारे शेकडो कोटींचे बनावट सीएसआर देणगी रॅकेट चालविल्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बुधवारी चार राज्यांसह दिल्ली-एनसीआरमध्ये एकाच वेळी आठ ठिकाणी छापेमारी केली. ईडीच्या मुंबई विभागाकडून ही कारवाई करण्यात आली. महाराष्ट्रातील पाच, पश्चिम बंगाल, गुजरात आणि दिल्ली-एनसीआरमधील प्रत्येकी एका ठिकाणी झडती घेण्यात आली.
डॉ. धर्मेंद्र कुमार आणि अन्य संबंधितांशी निगडित प्रकरणात ही कारवाई करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. बाजारातील ऑपरेटर, विविध ट्रस्टचे विश्वस्त आणि मध्यस्थांशी संबंधित कार्यालये, घरे ईडीच्या पथकांनी तपासली. प्राथमिक तपासात या नेटवर्कमधून शेकडो कोटींचे गैरव्यवहार झाल्याचे समोर आले आहे.
कमिशनच्या बदल्यात निधी परतवल्याचा ईडीला संशय
तपासात काही ट्रस्ट हे प्रत्यक्ष सामाजिक उपक्रम राबविण्याऐवजी कंपन्यांकडून मिळणारा अनिवार्य सीएसआर निधी स्वीकारून, कमिशनच्या बदल्यात तो पुन्हा संबंधित देणगीदारांकडे वळविण्यासाठी तयार करण्यात आल्याचा ईडीला संशय आहे. ईडीच्या पथकांनी झडतीदरम्यान इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि आर्थिक व्यवहारांशी संबंधित कागदपत्रांची तपासणी सुरू केली आहे.
उपकरणांमधील माहिती, ट्रस्टचे व्यवहार, संबंधित कंपन्या आणि मध्यस्थ यांच्यातील आर्थिक संबंधांची छाननी केली जात आहे. या तपासातून नेटवर्कमध्ये सहभागी असलेल्या अन्य व्यक्ती आणि संस्थांची माहिती मिळण्याची शक्यता आहे.
तपासाचा आवाका वाढण्याची शक्यता
सीएसआरच्या नावाखाली कंपन्यांकडून निधी घेऊन तो प्रत्यक्ष सामाजिक कामांवर खर्च करण्याऐवजी कमिशन कापून पुन्हा देणगीदारांकडे परत केला जात होता का, याचा तपास ईडीकडून केला जात आहे. मात्र, या टप्प्यावर ईडीकडून आरोपींची संपूर्ण यादी, नेमकी किती रक्कम जप्त झाली किंवा कोणत्या कंपन्या आणि ट्रस्टचा सहभाग आहे, याबाबत अधिकृत तपशील जाहीर केलेला नाही.