मुंबई; वृत्तसंस्था : मुंबई पोलिसांनी अमेरिकेतील आणि कॅनडातील नागरिकांची फसवणूक करणार्या एका बनावट आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरचा पर्दाफाश केला असून, याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
सागर गुप्ता नावाचा एक व्यक्ती मुलुंड कॉलनी येथे बनावट आंतरराष्ट्रीय कॉल सेंटर चालवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. हे लोक अमेरिकेतील एका कर्ज देणार्या संस्थेचे अधिकारी असल्याची बतावणी करून फिशिंग कॉल्स आणि मेसेज करत होते. त्वरित कर्ज देण्याचे आमिष दाखवून त्यांची फसवणूक करत होते.
पोलिसांनी पाच जणांना अटक केली असून त्यांच्याकडून दोन लॅपटॉप, 11 मोबाईल फोन, दोन राऊटर आणि 76,000 रुपये रोख रक्कम जप्त केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे सागर राजेश गुप्ता, अभिषेक सूर्यप्रकाश सिंग, तन्मय कुमार रजनीश धाडसिंग, शैलेश मनोहर शेट्टी आणि रोहन अन्सारी अशी आहेत. या प्रकरणातील इतर आरोपींचा शोध सुरू आहे.