मुंबई : राज आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येऊ नये, असा काही शासन निर्णय आम्ही काढलेला नाही. त्यांनी जरूर एकत्र यावे. क्रिकेट - टेनिस खेळावे; जेवण करावे आमची काहीच हरकत नाही. ते दोघे एकत्र येणार असतील तर आनंदच आहे. मात्र, उद्धव ठाकरेंच्या उपनेत्याने अहवालात हिंदी सक्तीची जी शिफारस केली आहे त्याबद्दल मात्र राज यांनी उद्धव ठाकरेंना जरूर प्रश्न विचारावा, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी उद्धव ठाकरेंना फटकारले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अन्य भाजपा नेत्यांच्या उपस्थित रविंद्र चव्हाण यांनी प्रदेशाध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला आहे. त्यावेळी माध्यमांशी बोलताना फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या विधानाचा समाचार घेतला. हिंदी सक्तीचा निर्णय आपल्या काळात झाला नाही, आपण केवळ शैक्षणिक धोरणाबाबतचा अहवाल स्वीकारल्याचे सांगत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर टीका केली होती. त्याला फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले.
उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळातच हिंदीबाबतचा अहवाल आला. उबाठाचा उपनेताच या समितीत होता. मात्र, उद्धव ठाकरे यांनी याबाबत नेहमीप्रमाणेच घूमजाव केले. आता आम्ही या संदर्भात समिती नेमली आहे. ही समिती ठरवेल. आम्ही कोणत्या पक्षाचे हित बघणार नाही, महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेतला जाईल असे सांगत मुख्यमंत्री फडणवीस यांनी ठाकरेंना फटकारले.
दरम्यान, मंगळवारी सायंकाळी पाच वाजता प्रदेशाध्यक्ष पदी नियुक्तीची अधिकृत घोषणा केली जाणार असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. प्रदेशाध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी निरिक्षक म्हणून केंद्रीय मंत्री किरण रिजीजू मुंबईत आले आहेत. रविंद्र चव्हाण यांच्या नियुक्तीची अधिकृत घोषणा झाल्यानंतर वरळी येथील मेळाव्यात पदग्रहणाचा कार्यक्रम होईल. महाराष्ट्राची निवडणूक झाल्यानंतर मुंबईसंदर्भात महाराष्ट्र अध्यक्ष आणि केंद्रीय नेतृत्व पुढील निर्णय घेईल, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.
भास्कर जाधव भाजपात प्रवेश करणार अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. त्याबाबत माध्यमांनी विचारले असता, भास्कर जाधव यांच्या मनात काय आहे हे ते स्वत: सांगू शकतात. सध्या कविता, शेरोशायरी यातून ते आपल्या मनातील भावना व्यक्त करत आहेत. आता त्यांचे नवीन स्टेटस येईल, त्यावरून तुम्ही अंदाज बांधा, असेही फडणवीस म्हणाले.
बीड येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणाबाबत निवेदन प्राप्त झाले आहे. त्यात या प्रकरणाची वरिष्ठ महिला आयपीएस अधिकाऱ्यामार्फर चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यासंदर्भात आपण स्वतः पोलीस महासंचालकांना या मागणीचा योग्य विचार करून पुढील कार्यवाही करावी असे निर्देश दिल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.