मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस File Photo
मुंबई

Maharashtra Politics | राजकारणी बाहेरून खडूस, आतून चांगले

आशा रेडिओ महोत्सवात शीघ्र कविता, मॉडेलिंगच्या किश्श्यांवरून मुख्यमंत्री फडणवीस यांची तुफान कोटी

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : राजकारणी बाहेरून खडूस असले तरी आतून खूपच चांगले असतात आणि याचे श्रेय गाण्यालाच जाते. त्यामुळे राजकारण्यांसाठी रेडिओ, गाणी आणि संगीत हे महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी आशा रेडिओ महोत्सवात केले. गाण्यामुळे थकवा दूर होऊन मनुष्य एका वेगळ्या दुनियेत रमतो, असे सांगत मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या कॉलेज जीवनातील केलेल्या कविता, त्यांच्यात जागा झालेला शीघ्र कवी आणि मॉडेलिंगच्या सांगितलेल्या किश्श्यांवरून यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे सभागृह टाळ्या आणि हास्यकल्लोळात बुडाले. दरम्यान, मराठी कार्यक्रमासाठी सामजिक उत्तरदायित्वाचे भान म्हणून कोल्हापूरच्या 'टोमॅटो एफएम'ला आशा रेडिओ पुरस्कारने गौरविण्यात आले.

सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने प्रथमच महाराष्ट्र रेडिओ महोत्सवांतर्गत आशा रेडिओ पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले, पार्श्वगायक सुदेश भोसले, सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, संचालक विभीषण चवरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस, आशा भोसले यांच्या हस्ते विश्वनाथ ओक यांना आशा रेडिओ जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. दरम्यान, अर्चना (रेडिओसिटी), रझीज हिरजी (बिग एफएम), सिद्धू (रेड एफएम), सपना भट (इश्क एफएम), अकी (मॅजिक एफएम) आणि भूषण (रेडिआ मिर्ची) या विविध रेडिओ केंद्राच्या रेडिओ जॉकींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेऊन कार्यक्रमात रंगत आणली. फडणवीस यांनीही राजकारण्याच्या जीवनात गाण्याला किती महत्त्व आहे हे अधोरेखित करत, विविध किस्से सांगत सभागृहाला हास्यकल्लोळात बुडवले. राजकारणाच्या कोणत्या वाटेवर आपल्याला गाण्याची मदत झाली... असा प्रश्न आरजेंनी विचारला असता फडणवीस यांनी २०२२ मधील गोष्ट सांगितली.

२०१९ ला निवडून आलो, पण आमचे सरकार आले नाही. २०२२ ला आमचे सरकार आणले आणि 'वो सिकंदर भी दोस्त कहलाते है, हारी बाजी को...' अशा गाण्याच्या ओळी म्हणत फडणवीसांनी दिलेल्या हजरजबाबी उत्तराला उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली. त्यामुळे संगीत, गाणे, रेडिओ या सगळ्या गोष्टी राजकारणासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत.

कॉलेजमध्ये मॉडेलिंगचा प्रॅंक

कॉलेजमध्ये केलेले मॉडेलिंग, कवी मनाबद्दल विचारले असता फडणवीस म्हणाले, मॉडेलिंग हा अपघात होता. माझ्या मित्राने माझ्यासोबत केलेला प्रॅक होता. सुदैवाने मी वाचलो. त्याच्यानंतर मी कधीची हिंमत केली नाही. मॉडेलिंग केले तेव्हा त्यावेळी ते गाजले. त्याचे कारण म्हणजे, जर कुत्रा माणसाला चावला तर बातमी नसते. पण माणूस कुत्र्याला चावला तर ती बातमी असते. त्यामुळे माझे मॉडेलिंग हे माणसाने कुत्र्याला चावण्यासारखे होते, म्हणून ती बातमी झाली होती, असे सांगतानच सभागृहात हास्यस्फोट झाला.

मुख्यमंत्री म्हणतात... मी रामदास आठवले घराण्याचा कवी

आरजेंनी आपण कविता करता ना असा प्रश्न विचारताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काहीसे हसून म्हणाले, मी रामदास आठवले घराण्याचा कवी आहे. म्हणजे कसे... तर

तुम्ही आहात आरजे मला येत नाही फारसे बाहेर लावले आरसे

संपूर्ण सभागृह हास्यकल्लोळात डुबून गेले असताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, कविता केल्या, कविसंमेलनात भाग घेतला. पण त्यातले जपून काहीच ठेवले नाही. एक जुनी कविता आठवतेय, ती सादर करतो असे नमूद करत म्हणाले, तुम्ही म्हणता माझ्या कवितेला अर्थ नसतो नसे ना का अर्थ, अनर्थ तर अरे तुम्ही काय कविता कराल ? पण आणि परंतु अशा अर्थपूर्ण पण निरर्थक शब्दांचा गुंता म्हणजे कविता नव्हे !

कविता म्हणजे मनाला छेदून गेली पाहिजे हृदयाला भेदून गेली पाहिजे आणि ती डोक्यावरून गेली पाहिजे !!

फडणवीसांच्या या शायराना अंदाजात आशा भोसले, आशिष शेलार आणि सभागृह बुडून गेले!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT