Fadnavis, Uddhav Share Same Flight | फडणवीस-उद्धव ठाकरे योगायोगाने एकाच विमानात!  
मुंबई

Fadnavis, Uddhav Share Same Flight | फडणवीस-उद्धव ठाकरे योगायोगाने एकाच विमानात!

आपली भेट हीच होईल बातमी; फडणवीसांची कोपरखळी

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इंडिगोच्या विमानाने नागपूर येथे नियोजित कार्यक्रमासाठी जात असताना त्याच विमानाने यवतमाळ लोकसभा मतदारसंघात जाण्यासाठी उद्धव ठाकरे सहकाऱ्यांसह पोहोचले आणि आजी-माजी मुख्यमंत्री एकमेकांना अवचित भेटले.

सहा खासदार शिंदे यांच्या गटात सामील झाल्यानंतर या बंडखोर खासदारांच्या मतदारसंघांचा दौरा करण्याचा कार्यक्रम उद्धव ठाकरे यांनी हाती घेतला आहे. शुक्रवारी या मोहिमेची सुरुवात करण्यासाठी यवतमाळला जाण्याकरिता ते इंडिगोच्या विमानाने नागपूरकडे निघाले होते. नागपूरहून ते यवतमाळ वाशिम या संजय देशमुख या पक्षांतर केलेल्या खासदाराच्या मतदारसंघात पोहोचणार होते. नेमके त्याच विमानाने मुख्यमंत्री फडणवीस प्रवास करणार होते. विमानतळावर आजी-माजी मुख्यमंत्र्यांची भेट झाली आणि दोघांनीही परस्परांशी हात मिळवले. हस्तांदोलन झाले तेही सध्या राजकीय गरमागरमी आणि पळवापळवीचा मोसम सुरू असताना.

हे दोघे परस्पर विरोधातील नेते एकत्र आल्यामुळे माध्यमांवर जोरदार चर्चा सुरू झाली. या चर्चेला प्रारंभीच पूर्णविराम देत मुख्यमंत्री फडणवीस यांनी विमानतळावरच एक कोपरखळी मारली. ते उद्धव ठाकरे यांना उद्देशून म्हणाले की, तुम्ही आणि मी एकाच विमानातून प्रवास करतो आहोत हीच एक मोठी बातमी असेल! त्यानंतर हास्यविनोद करत दोघेही विमानात बसण्यासाठी निघून गेले. या विमान प्रवासात उद्धव ठाकरे यांच्या समावेत आदित्य ठाकरे, अनिल देसाई, विनायक राऊत हे शिवसेना नेतेही होते. पुढचे तीन दिवस उद्धव ठाकरे यवतमाळ, हिंगोली, परभणी, धाराशिव आणि शिर्डी या लोकसभा मतदारसंघात सभा घेणार आहेत. मुंबई - नागपूर हा विमानप्रवास सुमारे सव्वा तासाचा असतो. या दरम्यान दोघेही परस्परांशेजारी बसले होते काय, ते नेमके काय बोलले याची उत्सुकतापूर्ण चर्चा सुरू झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT