मुंबई : 26-11 सारखा हल्ला यापुढे कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही. या हल्ल्याचा योग्य वेळी निश्चित बदला घेऊ, असा खणखणीत इशारा परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिला.
मोदी सरकारच्या दहा वर्षांच्या काळात बांगला देश आणि म्यानमारच्या सीमांवर कुंपण घालण्याचे काम मोठ्या प्रमाणावर हाती घेतले गेले. त्यामुळे घुसखोरीत घट झाली आहे. भारतात कोणीही कसेही घुसावे ही 2014 पूर्वीची स्थिती आता राहिलेली नाही, असा निर्वाळाही त्यांनी दिला.
मणिपूरमधील प्रश्न गुंतागुंतीचे आहेत हे खरे आहे. मात्र मणिपूरच्या नावावर भारताची प्रतिमा जगासमोर मलिन करण्याचा राजकीय अजेंडा केवळ दुर्दैवी आहे. लोकशाही व्यवस्था कधीच परिपूर्ण नसते. तेथे काही समस्या असतात, असेही त्यांनी नमूद केले.
21 ऑक्टोबरला भारत-चीन चर्चेदरम्यान काही मुद्द्यांवर सहमती झाल्याने गस्तीमध्ये येणार्या अडचणी दूर झाल्या आहेत. सैन्य माघारीबाबत समोरून कोणती पावले उचलली जातात, त्यावरच भारताची भूमिका ठरणार असल्याचे जयशंकर यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर देशावर यापुढे 26-11 सारखा हल्ला कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
औद्योगिक प्रगतीत महाराष्ट्र देशात अव्वल आहे. जगभरातील गुंतवणूकदारांची पहिली पसंती महाराष्ट्राला असते. मात्र ही गुंतवणूक प्रत्यक्षात येण्यासाठी राज्य सरकारांच्या प्रामाणिक प्रयत्नांची, अंमलबजावणीची गरज असते. त्यामुळे महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी इथे डबल इंजिनचे सरकार आवश्यक असल्याची भूमिकाही त्यांनी मांडली. महाविकास आघाडीचे सरकार किंवा विरोधी पक्षांच्या सरकारांनी घेतलेल्या आडमुठ्या भूमिकेमुळे, उद्योगविरोधी धोरणांमुळे अनेकदा गुंतवणूकदारांनी संबंधित राज्यांतून काढता पाय घेतला आहे. त्यामुळे भाजपवर आरोप करण्यापूर्वी विरोधकांनी आधी स्वतःचा चेहराही आरशात बघावा, असा टोला त्यांनी लगावला.