मुंबई: पुढारी वृत्तसेवा : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेत प्रमाणपत्र, पदविका, पदवी, पदव्युत्तर पदविका आणि पदव्युत्तर पदवीस प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रवेश अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. 20424-25 या शैक्षणिक वर्षासाठी इच्छुकांना 30 सप्टेंबर 2024 पर्यंत प्रवेश घेता येणार आहे, अशी माहिती विद्यापीठाच्या मुंबई विभागाचे संचालक डॉ. वामन नाखले यांनी आज (दि. 17) दिली. (YCMOU)
डॉ. वामन नाखले म्हणाले की, मुक्त विद्यापीठाचे अनेक शिक्षणक्रम मराठी, हिंदी, इंग्रजी आणि उर्दू माध्यमात उपलब्ध आहेत. विद्यापीठाने चालू शैक्षणिक वर्षात प्रमाणपत्र स्तरावरील (32), पदविका स्तरावरील (50), पदवी स्तरावरील (१६) आणि पदव्युत्तर पदवी सत्रावरील (33) शिक्षणक्रम सुरू केलेले आहेत. यात विज्ञान शाखेतील पदव्युत्तर पदवी आणि उर्दू माध्यमातील पदव्युत्तर पदवी या शिक्षणक्रमांचा नव्याने समावेश केला आहे. (YCMOU)
या शैक्षणिक वर्षापासून विज्ञान शाखेतील पदविका आणि पदव्युत्तर पदवीचे शिक्षणक्रम तसेच, उर्दू माध्यमातील पदव्युत्तर पदवी शिक्षणक्रम यूजीसीच्या मान्यतेने सुरु केले जात आहेत. तसेच, प्रशासकीय सेवांकडे विद्यार्थ्यांचा वाढता कल लक्षात घेऊन लोक प्रशासनाचा पदव्युत्तर पदवी शिक्षणक्रमही (MA in Public Administration) उपलब्ध केला आहे.
राज्यातील बंदिजनांसाठी विविध प्रमाणपत्र, पदविका आणि पदवी शिक्षणक्रम पूर्णतः मोफत उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्याचा लाभही राज्यभरातील 11 कारागृहांतील बंदीजन घेत आहेत. मुंबईमधील 3 कारागृहांमधील बंदीजन विद्यापीठाचे विद्यार्थी आहेत. विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानावर आधारित शैक्षणिक सेवा, सुविधा पुरविण्यावर भर देण्यात येणार आहे. प्रवेशापासून परीक्षेपर्यंत सर्व प्रक्रिया ऑनलाईन पद्दतीने असल्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या सोयीने शिक्षणक्रम पूर्ण करता येणार आहेत.(YCMOU)
सविस्तर माहितीसाठी विद्यापीठाच्या http://ycmou.digitaluniversity.ac अथवा www.ycmou.ac.in या संकेतस्थळांना भेट द्यावी किंवा मुंबई विभागीय केंद्राच्या खालील पत्त्यावर चौकशीसाठी संपर्क साधावा, असे आवाहन विद्यापीठातर्फे करण्यात आले आहे.