FDA Action pudhari photo
मुंबई

Mumbai FDA Action: रिलायन्स, ब्लिंकिट, झोमॅटोच्या गोदामांवर एफडीएची धाड; पाच कोटींचा साठा जप्त

सहा परवाने निलंबित; दोन गुन्हे दाखल

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: मुदतबाह्य, खराब झालेले अन्नपदार्थ विल्हेवाटीच्या नावाखाली बाजारात विक्रीसाठी आणले जात असल्याचा प्रकार अन्न व औषध प्रशासनाच्या शोधमोहिमेत उघडकीस आला.

ठाणे, नवी मुंबई आणि पुणे जिल्ह्यांत राबविलेल्या या मोहिमेत पाच कोटींचा अन्नसाठा जप्त केला. रिलायन्स, ब्लिंकिट, झोमॅटो कंपन्यांच्या गोदामांची तपासणी करण्यात आली. या वेळी सहा आस्थापनांचे परवाने तात्काळ निलंबित करण्यात आले आहेत.

भिवंडी, अंबरनाथ, तुर्भे, चाकण आणि निघोजे परिसरातील किरकोळ विक्री केंद्रे, गोदामे, वितरण केंद्रे आणि शीतगृहांची तपासणी करण्यात आली. या कारवाईत एकूण ५ कोटी १४ लाख ४० हजार ४० रुपयांचा साठा जप्त करण्यात आला.

नवी मुंबईतील तुर्भे येथील मे. सावला फूड्स अँड कोल्ड स्टोरेजच्या शीतगृहात कारवाई करताना मुदतबाह्य असलेला ९१ हजार ३५३ किलो अन्नसाठा आढळला. त्याची किंमत ४ कोटी १२ लाख रुपये आहे.

भिवंडीतील ब्लिंक कॉमर्सच्या पागाव येथील गोदामात ३२ लाख ७१ हजार ७७४ रुपये किमतीचे १८ हजार ४०५ नग मुदतबाह्य व खराब अन्नपदार्थ आढळले. विल्हेवाटीची आवश्यक कागदपत्रे सादर न केल्याने कंपनीचा परवाना निलंबित करण्यात आला. याप्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पडघा येथील क्लाउडस्टोर रिटेलच्या गोदामात ६ लाख ८८ हजार ४२ रुपये किमतीचे ७ हजार ५६६ नग मुदतबाह्य, खराब व नाकारलेले अन्नपदार्थ आढळले. अंतिम विल्हेवाटीचे पुरावे उपलब्ध नसल्याने परवाना निलंबित करण्यात आला. याप्रकरणी पाडघा पोलीस ठाण्यातही गुन्हा दाखल झाला आहे.

विल्हेवाटीची कागदपत्रे, वाहतूक तपशील, वजन पावत्या आणि अंतिम नाशाचे पुरावे सादर न झाल्याने १५ ऑक्टोबर रोजी या तीन आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले. झोमॅटोच्या गोदामात ५ हजार ४३१ उत्पादने म्हणजेच सुमारे ९ हजार ५९० किलो खराब, मुदतबाह्य व नाकारलेला साठा आढळला.

पुणे जिल्ह्यातील चाकण येथील रिलायन्स रिटेल आणि निघोजे येथील ब्लिंकिट कॉमर्सच्या आस्थापनांबाबतही परवाना निलंबनाचे आदेश जारी करण्यात आले आहेत. या मोहिमेदरम्यान भिवंडीतील काही किरकोळ विक्री केंद्रांवरही कारवाई करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT