मुंबई : पुढारी वृत्तसेवा
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा बिगुल केव्हा वाजणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. या पार्श्वभूमीवर मंत्रालयातील कामांची लगबग सध्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. येत्या १३ तारखेनंतर कधीही निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
चालू महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात आदर्श आचारसंहिता लागू होण्याचे संकेत असल्याने राज्य मंत्रिमंडळानेही विविध निर्णय घेण्याचा धडाका लावला आहे. शुक्रवारी मंत्रिमंडळाची पुन्हा बैठक होणार आहे. गेल्या चार दिवसांतील ही दूसरी बैठक आहे. आठ ऑक्टोबर रोजी हरियाणा आणि जम्मू काश्मीरच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होणार आहेत.
त्यानंतर दहा तारखेला या दोन्ही राज्यांचा निवडणूक कार्यक्रम संपुष्टात येईल. नियमानुसार एक निवडणूक कार्यक्रम संपण्यापूर्वी दुसऱ्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करता येत नाही. त्यामुळे १४ तारखेपासून सुरू होणाऱ्या आठवड्यात म्हणजे ऑक्टोबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजू शकतो. विद्यमान विधानसभेची मुदत २६ नोव्हेंबर २०२४ रोजी संपुष्टात येणार आहे. १३ ऑक्टोबरनंतर कोणत्याही क्षणी राज्यात निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
चालू महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात आदर्श आचारसंहिता लागू होण्याची शक्यता लक्षात घेऊन मंत्रालयातील हालचालींना वेग आला आहे. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी नवे प्रस्ताव आणि फायलींच्या मंजुरीचा वेग कैकपटींनी वाढला आहे. राज्य मंत्रिमंडळ बैठकीतही निर्णयांचा धडाका सुरू आहे. दिवसाकाठी अनेक निर्णय हातावेगळे केले जात आहेत. यासाठी आमदारांपासून मंत्र्यांची धावाधाव सुरू आहे.
या आठवड्यात दुसऱ्यांदा शुक्रवारी मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. या बैठकीतही निर्णयांचा धडाका असण्याची शक्यता आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाचे एक पथक गेल्या आठवड्यात महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात या पथकाने राज्यातील सर्वच राजकीय पक्ष आणि जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला होता. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना या पथकातील अधिकाऱ्यांनी २६ नोव्हेंबरपूर्वी राज्यात विधानसभा निवडणुकीचा बार उडणार असल्याचे संकेत दिले होते.
विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली असली तरी सत्ताधारी महायुती आणि विरोधी बाकावरील महाविकास आघाडीचे जागावाटप अद्याप हातावेगळे झालेले नाही. या दोन्ही आघाड्यांत सध्या जागावाटपाची गरमागरम चर्चा सुरू आहे. अनेक जागांवरून त्यांच्यात मतभेदही निर्माण झाल्याची माहिती सातत्याने समोर येत आहे. दोन्ही आघाड्यांत प्रत्येकी तीन घटक पक्षांचा समावेश असल्यामुळे जागावाटप करताना त्यांची दमछाक होताना दिसून आहे.