Malad Raheja society landslide risk Pudhari
मुंबई

Malad Landslide Danger: अतिधोकादायक जाहीर केले की BMC ची जबाबदारी संपते का?, मालाडच्या उच्चभ्रू सोसायटीवरही दरडीचे सावट

Raheja Landslide Mumbai: गतवर्षी कोसळलेली दरड अजूनही उचललीच नाही

पुढारी वृत्तसेवा

Malad East Raheja Society Landslide Threat 2025

मुंबई : निसार अली

मालाड पूर्व येथील उच्चभ्रू गृह संकुलातील रहिवाशांनाही दरडीपासून धोका आहे. येथील रहेजा गृह संकुलमध्ये जवळपास 15 हून अधिक गृहनिर्माण सोसायट्या आहेत. यात सुमारे 15 ते 20 इमारती आहेत. यात उच्चभ्रू समजले जाणारे असे दोन ते अडीच हजार लोक वास्तव्य करत आहेत. पण त्यांच्यावरही दरडीचे सावट आहेच.

स्टेट बँक, रिझर्व्ह बँक आणि इतर खासगी व्यापारी अथवा नोकरी-व्यवसाय करणारे लोक याठिकाणी वास्तव्य करत आहेत. 35 वर्षाहून अधीक जुनी अशी ही वस्ती आहे. लगतच दिंडोशी पोलीस ठाणे, दिंडोशी मेट्रो स्थानक, पश्चिम दुतगती मार्ग आणि साई बाबांचे जुने मंदिर आहे. येथील अनेक इमारतीच्या आवारात अनेकवेळा दरड कोसळण्याच्या घटना घडल्या. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र पुढे जर अशी दुर्घटना घडली तर त्यात मोठे नुकसान होऊ शकते, असे रहिवासी सांगतात.

गतवर्षी रहेजा संकुलतील ‘डी’ इमारतीच्या मागील परिसरात दरड कोसळून दोन चारचाकी गाड्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर पालिका प्रशासनाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. मात्र पुढे सुरक्षेचे उपाय काहीच केले नाहीत. विशेष म्हणजे कोसळलेले मोठमोठे दगड वर्षभर त्याच ठिकाणी पडून आहेत. पालिकेच्या या निष्काळजीपणाबद्दल रहिवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

ज्या डोंगराळ भागवरून दरड कोसळली त्याठिकाणी असलेले मोठे वृक्षही पाडून दुर्घटना होण्याची भीती रहिवासी व्यक्त करतात. कारण यापूर्वी दोन मोठे वृक्ष मोहम्मदी गृहनिर्माण सोसायटीच्या संरक्षक भिंतीवर कोसळले होते. इतर धोकादायक वृक्ष झुकलेल्या स्थितीत आहेत. मोठे वादळ झाल्यास ते कधीही पडू शकतात, अशी भीती रहिवाशांना वाटते.

रहिवाशांची मागणी आहे की मुंबई महानगर पालिकेने सुरक्षाविषयक उपाययोजना करावी. एक्सप्रेस वे अथवा कोकण रेल्वेच्या ट्रॅक भोवती लावण्यात आलेल्या जाळ्यांप्रमाणे डोंगराळ भागात लोखंडी जाळी लावावी. तसेच धोकादायक झाडे काढून टाकावीत. दुर्घटना घडू नये यासाठी कायमस्वरुपी उपाययोजना कराव्यात.

मुंबईच्या 74 ठिकाणच्या वस्त्यांवर दरडींचा धोका लटकलेला आहे. हजारो मुंबईकर एक तर दरडीवर नाही तर दरडीखाली राहतात. कधी काय होईल याचा नेम नाही. पावसाळ्यात तर मोठा धोका. सुरक्षित ठिकाणी जायचे तर जाणार कुठे? आहे त्याच दरडींच्या भयछायेत जीव मुठीत घेऊन जगण्याशिवाय त्यांच्यापुढे दुसरा पर्याय नाही. मुंबईत अशा अतिधोकादायक 46 दरडींवर लोकवस्ती आहे. येईल त्या प्रसंगाला तोंड देत ते वर्षानुवर्षे राहात आहेत. अशा जीवघेण्या दरडींवरील लोकवस्तींचे भयभीत जगणे मांडणारी ही वृत्तमालिका- आमच्या इमारतीच्या मागच्या भागात गेल्या वर्षी मोठमोठे दगड कोसळले होते. त्यात रहिवाशांच्या दोन किमती गाड्यांचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने दरड कोसळली त्यावेळी तिथे कोणी नसल्याने जीवितहानी टळली.
- सविता देशमुख, रहिवासी ‘डी’ विंग, रहेजा संकुल
अधूनमधू दरड खोसळण्याच्या घटना घडत आहेत. मागील वर्षी कोसळलेली दरड अजूनही पढून आहे. पालिकेने धोकादाय झाडांकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. अतिधोकादायक म्हणून नुसते जाहीर केले की पालिकेची जबाबदारी संपते का ?
- संगीता कंनूर, रहिवासी, मोहम्मदी गृहनिर्माण सोसायटी
आम्ही गेली 35 वर्षांपासून येथे वास्तव्य करत आहोत. मागील वर्षी दरड कोसळली होती. त्यानंतर पालिका पाहणी करून गेली. आमच्या इमारतीच्या शेजारी असलेल्या डोंगराळ भागातील झाडे धोकादायक झालेली आहेत. त्याबाबत पालिकेने कारवाई करणे अपेक्षित आहे.
- फिरोझ पटेल, स्थानिक रहिवासी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT