Esha Deol On Dharmendra Death:
प्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र यांचे आज (दि. ११ नोव्हेंबर) रोजी दीर्घ आजारानं निधन झाल्याचं वृत्त प्रसिद्ध झालं होतं. मात्र याबाबत त्यांची मुलगी इशा देओलनं मोठा खुलासा केला आहे. तिनं सोशल मीडिया पोस्ट करून धर्मेंद्र यांच्या निधनाचे वृत्त खोटं आहे. माध्यमांना फारच घाई झाल्याचं देखील ती म्हणाली. तिनं माझे वडील स्टेबल असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचं देखील या पोस्टमध्ये सांगितलं.
आज सकाळी प्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र यांचे निधन झाल्याचं वृत्त वाऱ्यासारखं पसरलं. मात्र त्यानंतर काही मिनिटातच धर्मेंद्र यांची मुलगी इशा देओलनं इन्स्टाग्रामवर पोस्ट करत हे वृत्त चुकीचं असल्याचं सांगितलं. इशा आपल्या पोस्टमध्ये म्हणते, 'माध्यमांना खूप गडबड झालेली दिसतेय आणि ते चुकीची बातमी पसरवत आहेत. माझे वडील स्टेबल आणि बरे होत आहेत. मी सर्वांना एक विनंती करते की आमच्या कुटुंबियांना थोडी प्रायव्हसी द्या. पप्पांच्या लवकर बरे होण्याबाबत दिलेल्या शुभेच्छा आणि प्रार्थनांसाठी आभारी आहे.'
दरम्यान, धर्मेंद्र यांची पत्नी हेमा मालिनीने देखील ट्विट करून ही माहिती चुकीची असल्याचं म्हटलं आहे. त्यांनी, 'जे काही होत आहे ते विसरण्यासारख नाहीये! एखादा जबाबदार चॅनल जी व्यक्ती उपचारांना प्रतिसाद देत आहे आणि रिकव्हर करत आहे अशा व्यक्तीबद्दल अशी खोटी बातमी कशी पसरवू शकतो. हे खूप अपमानकारक आणि बेजबाबदारपणाचं आहे. तुम्ही कुटुंबियांचा अन् त्यांच्या प्रायव्हसीचा देखील आदर करा.'
हिंदी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र काही दिवसांपासून मुंबईतिल ब्रिच कँडी रुग्णालयात दाखल होते. त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
वयोमानानुसार श्वासोच्छवासाची तक्रार आल्यावर त्यांच्या कुंटूंबियांनी त्यांना ब्रिच कँडी या रुग्णालयात दाखल केले होते. त्यांना व्हेटींलेटर लावण्यात आला होता. डॉक्टरांच्या देखरेखेखाली त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.