मुंबई : अभियांत्रिकी पदवीच्या प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांना संस्थास्तरावर किंवा व्यवस्थापन कोट्यातून प्रवेश मिळाल्यास, कॅपमधील प्रवेश रद्द करण्यासाठी थेट त्यांच्या लॉगिनमध्ये लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने यासंदर्भात परिपत्रक जारी करून संस्थांना तसेच विद्यार्थ्यांना स्पष्ट सूचना केल्या आहेत.
शैक्षणिक वर्ष 2025-26 साठीच्या संस्थात्मक आणि व्यवस्थापन कोट्यातील प्रवेशासंबंधी नियमावलीदेखील स्पष्ट करण्यात आली आहे. 8 ते 15 सप्टेंबर या कालावधीत संस्थात्मक व व्यवस्थापन कोट्यातील प्रवेश प्रक्रियेचे आयोजन केले असून, गुणवत्तेच्या आधारेच प्रवेश द्यावेत, अशी सक्त सूचना सीईटी सेलने दिली आहे.
माहिती पुस्तिकेतील नियम क्रमांक 15 नुसार कोणत्याही कारणास्तव प्रवेश रद्द करावयाचा असल्यास, विद्यार्थ्यांना लॉगिनमध्ये उपलब्ध लिंकद्वारेच ही प्रक्रिया करावी लागणार आहे. ही लिंक कट-ऑफ डेटपर्यंत सक्रिय राहणार असून, या मार्गाने प्रवेश रद्द केल्यास सिक्युरिटी डिपॉझिट आणि कॉशन मनी वगळता इतर सर्व शुल्क परत मिळणार असल्याचे परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.
संस्थात्मक कोट्यातून प्रवेश घेण्यासाठी काही विद्यार्थ्यांनी थेट संस्थेकडे अर्ज केले असून, काहींनी सीईटी पोर्टलवर ऑप्शन फॉर्म भरले आहेत. या सर्व अर्जांची यादी संबंधित संस्थांच्या लॉगिनमध्ये उपलब्ध करून दिली जाणार आहे. संस्थात्मक कोटा सरेंडर केलेल्या संस्था किंवा ज्यांच्याकडे कोटा उपलब्ध नाही, त्यांना केवळ केंद्रीभूत प्रवेशानंतर रिक्त राहिलेल्या जागा भरण्याची परवानगी असणार आहे.