मुंबई : प्रभादेवी पुलाचे तोडकाम अंतिम टप्प्यात असून दुसऱ्या बाजूला पायाभरणीचे कामही सुरू आहे. मात्र यामुळे आजूबाजूच्या इमारतींना हादरे बसत असल्याची तक्रार रहिवाशांनी केली आहे.
पुलाच्या दोन्ही बाजूंना शेकडो वर्षे जुन्या इमारती आहेत. पुलाच्या कामादरम्यान इमारतींना हादरे बसतील. त्यामुळे या इमारतींच्या समूह पुनर्विकासाचा निर्णय घ्यावा, या मागणीसाठी रहिवाशांनी अनेकदा आंदोलने केली. मात्र अद्याप शासनाने त्यावर तोडगा काढलेला नाही.
आता या पुलाची पायाभरणी सुरू असताना वापरल्या जाणाऱ्या यंत्रांमुळे इमारतींना हादरे बसत असल्याचे येथील रहिवासी सईद कुमटे यांनी सांगितले. जिमी चेंबर येथे 24 आणि समर्थ निवास येथे 52 कुटुंबे राहतात. या इमारतींना हादरे जाणवत आहेत. ही समस्या एमएमआरडीएच्या निदर्शनास आणून देण्यासाठी गुरुवारी संध्याकाळी रहिवासी एकत्र आले होते.
या ठिकाणी दुमजली पूल उभारण्यात येणार असून त्याची पायाभरणी केली जात आहे. पूर्व-पश्चिम वाहतुकीसाठी रेल्वे स्थानकावर पूल उभारला जाईल. त्याच्या वर दुसरा पूल उभारला जाणार असून तो वरळी-शिवडी जोडरस्त्याचा भाग असेल. वरळी-शिवडी जोडरस्ता अटल सेतू आणि वांद्रे-वरळी सागरी सेतूला जोडण्यासाठी बांधला जात आहे.