मुंबई : प्रभादेवीमधील बहुचर्चित एल्फिन्स्टन हा ब्रिटिशकालीन पूल 10 सप्टेंबरपासून वाहतुकीसाठी बंद केला जाणार आहे. म्हणजेच गणेशोत्वसानंतर पुलाचे पाडकाम सुरू होणार आहे. वाहतूक विभागाने याबाबत अधिकृत माहिती दिली आहे.
स्थानिक आणि दुकानदारांच्या विरोधामुळे वारंवार ही तारीख पुढे ढकलण्यात आली होती. या पुलासोबत परिसरातील काही इमारतीही पाडल्या जात आहेत. या इमारतीमधील रहिवाशांनी पुनर्वसनाचा प्रश्न सोडवण्याची आणि त्यानंतर पाडकाम करण्याची मागणी केली होती. त्याबाबत मात्र अद्याप तोडगा निघालेला नाही. वाहतूक विभागाने आता नवी तारीख जाहीर केल्यानंतर स्थानिक पुन्हा आक्रमक होण्याची शक्यता आहे.
गणेशोत्सवानंतर 10 सप्टेंबरपासून एल्फिन्स्टन पूल बंद केला जाईल. हा पूल पाडून तिथे डबलडेकर पूल उभा केला जाणार आहे. अनंत चतुर्दशीनंतर तीन दिवसांनी पूल बंद केला जाणार आहे. सुरक्षेच्या कारणास्तव पूल लवकरात लवकर पाडण्याचा प्रयत्न आहे. गणेशोत्सवात पूल पाडला तर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असल्याने 10 सप्टेंबर तारीख निवडल्याचे वाहतूक विभागाने स्पष्ट केले.
एल्फिन्स्टन पुलाचे महत्त्व
एल्फिन्स्टन पूल हा मुंबईतील परळ आणि प्रभादेवी परिसराला पूर्व-पश्चिम जोडणारा 125 वर्षे जुना ब्रिटिशकालीन पूल आहे. हा पूल मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गांना जोडतो आणि वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.
एल्फिन्स्टन पूल का बंद होत आहे?
एल्फिन्स्टन पूल पाडून त्याच्या जागी नवीन उड्डाणपूल आणि शिवडी-वरळी एलिव्हेटेड कनेक्टर उड्डाणपूल बांधण्यासाठी हा पूल बंद होत आहे. पूल धोकादायक झाल्याने त्याची पुनर्बांधणी आवश्यक आहे. एल्फिन्स्टन पूल पुनर्बांधणीसाठी सुमारे दोन वर्षांसाठी बंद राहील.
एल्फिस्टन पूल परळ आणि प्रभादेवीला जोडणारा महत्त्वाचा पूल आहे. परळ येथून सिद्धिविनायक मंदिर, दादर, लोअर परळ, वरळीला जाण्यासाठी तसेच प्रभादेवी येथून दादर पूर्व, लालबाग, शिवडी, परळ व्हिलेज येथे जाण्यासाठी हा पूल वापरला जातो. त्यामुळेच हा पूल बंद झाल्यास करीरोड आणि दादरमधील पुलांवर अतिरिक्त भार पडणार आहे.