Legislative Council Elections File Photo
मुंबई

विधान परिषदेच्या ११ जागांची निवडणूक बिनविरोध होणार?

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : विधानसभेतून विधान परिषदेवर पाठवायच्या रिक्त अकरा जागांसाठी महायुती ९ आणि महाविकास आघाडी २ असा समेट झाल्यामुळे विधान परिषदेची ही निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे. महायुतीत भाजप ५, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) प्रत्येकी दोन तर महाविकास आघाडीत काँग्रेस एक आणि शेकाप एक असे मंगळवारी उमेदवारी अर्ज भरले जातील.

मंगळवारी २ जुलैला उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असून ३ जुलैला उमेदवारी अर्जाची छाननी करण्यात येईल. त्यानंतर ५ जुलैला उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. याच दिवशी निवडणूक बिनविरोध झाल्यास ११ ही उमेदवारांना विजयी घोषित केले जाईल.

गेल्या दोन दिवसांपासून आघाडीच्या नेत्यांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चर्चा सुरू होती. त्यांनी नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांच्याशी चर्चा केली.

सोमवारी दुपारी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काँग्रेसच्या नेत्यांशी बोलणी केली आणि काँग्रेस एकच उमेदवार देईल, दुसरा उमेदवार दिला जाणार नाही, असा शब्द काँग्रेसच्या नेत्यांनी दिला. तसेच काँग्रेसने डॉ. प्रज्ञा राजीव सातव यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर केली.

आमदारांची मत-फूट टाळण्यासाठी निर्णय

काँग्रेसकडे ३८, शिवसेना ठाकरे गट १५ आणि शरद पवार गट १० असे ६३ आमदार आघाडीकडे आहेत. जर निवडणूक झाली तर काँग्रेस आपल्या उमेदवाराला २६ पेक्षा जास्त मतांचा कोटा देईल, पहिल्या पसंतीची केवळ १२ मते काँग्रेसकडे उरतात, तर शिवसेना ठाकरे गट १५ आणि शरद पवार गट १० अशी २५ मते या दोन पक्षांकडे आहेत. त्यांनी लोकसभा निवडणुकीत शेकापचे जयंत पाटील यांना विधान परिषदेची जागा देण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे शेकापचे जयंत पाटील यांना आघाडीकडून उमेदवारी देण्यात येणार आहे. त्यामुळे तिसरा उमेदवार उभा केला तर निवडणूक अटळ होती.

या निवडणुकीत आमदारांची मते फुटली तर आगामी विधानसभा निवडणुकीत संशयाचे वातावरण होईल, त्यामुळे काँग्रेस विनविरोध निवडणुकीसाठी राजी झाली. शिवसेना (ठाकरे) गट मात्र एक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यास इच्छुक होती. यासाठी मिलिंद नार्वेकर यांचे नावही चर्चेत आले होते. मात्र नार्वेकरांच्या उमेदवारीबाबत शिवसेनेतर्फे दुजोरा देण्यात आला नाही. त्यामुळे शिवसेनाही बिनविरोधसाठी राजी झाल्याचे सांगितले जात आहे.

महायुतीचे ९ उमेदवार विधानसभेतील महायुतीचे

संख्याबळ बघता ते ९ उमेदवार रिंगणात उतरवत आहेत. विधान परिषद निवडणुकीसाठी गुप्त मतदान असल्याने आमदारांची मते फुटतात, असे यापूर्वी घडले आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने ३१ जागा जिंकल्या आहेत त्यामुळे महायुतीच्या आमदारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जर आपले काही आमदार आघाडीच्या गळाला लागले तर अडचणीचे ठरेल. त्यामुळे महायुतीच्या नेत्यांनी समेट केला. तसेच विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर घोडेबाजार परवडणारा नाही. त्यामुळे दोन्हींकडून ही निवडणूक बिनविरोध करण्याचे ठरविले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT