मुंबई : विधानसभा निवडणुकांच्या (Maharashtra elections 2024) पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी मुंबईत दाखल झालेल्या केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) शुक्रवारी पहिल्याच दिवशी राज्य शासनावर कठोर ताशेरे ओढत निवडणुकांच्या बदल्या टाळल्याबद्दल खुलासा मागितला असून गेल्या लोकसभा निवडणुकीत मतदान केंद्रांवर आढळलेल्या गैरसोयींबद्दलही तीव्र नाराजी व्यक्त केली.
केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी मुंबईत दाखल झालेल्या केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) शुक्रवारी विविध यंत्रणांच्या बैठका घेतल्या. मुख्य सचिव सुजाता सौनिक, राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, केंद्रीय निवडणूक आयुक्त ग्यानेश कुमार आणि निवडणूक आयुक्त डॉ. सुखबीर सिंह संधू, राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी, अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी पी. प्रदीप बैठकीला उपस्थित होते. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी विधानसभा निवडणुकीबाबत आतापर्यंत केलेल्या तयारीची माहिती बैठकीत दिली.
विधानसभा निवडणुकीत रोख रकमेची ने-आण करण्यासाठी पोलिस व्हॅन किंवा रुग्णवाहिकांचा वापर होऊ शकतो. हे विचारात घेऊन रोख रकमेचा हा प्रवास रोखण्यासाठी विशेष काळजी घेण्याच्या सूचनाही आयोगाने दिल्या. कठोर निगराणी ठेवतानाच पैशांचा प्रसार थांबविण्यासाठी परिणामकारक उपाय योजण्याचा सल्लाही आयोगाने दिला.
विधानसभेच्या रणधुमाळीत सर्व हेलिकॉप्टर्स तपासा, व्हीआयपी म्हणून कुणालाही सूट नको. सर्वच नेत्यांच्या, स्टार प्रचारकांच्या हेलिकॉप्टरची कसून तपासणी करा, अशा सक्त सूचना केंद्रीय निवडणूक आयुक्तांनी प्रशासन आणि तपास यंत्रणांना दिल्या. गेल्या लोकसभा निवडणुकीत नाशिक दौऱ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरमधून मोठ्या बॅगा गेल्या. मात्र, त्यांची तपासणी झाली नव्हती. त्यावरून झालेल्या वादाची नोंद घेत आयोगाने (Election Commission) या सूचना केल्या आहेत.