मुंबई : पूर्वीसारखे रस्ते, गल्लीबोळात प्रचार करून निवडणूक जिंकणे सोपे राहिलेले नाही. प्रत्येक उमेदवाराला मतदार राजापर्यंत प्रत्यक्ष पोहोचावे लागत आहे. यासाठी इमारतींच्या पायर्या चढून उमेदवाराचे जीवन मेटाकोटीस येत आहे. पाय पूर्णपणे भरून येत असल्यामुळे अनेक उमेदवारांनी दिवसभराचा थकवा घालवण्यासाठी रात्रीच्या वेळी मालिश करून घेण्यावर भर ठेवला आहे. त्यामुळे सध्या मालिशवाल्यांचा धंदाही तेजीत आहे.
निवडणूक लढवणे सोपे नसते, असे म्हटले जाते. निवडणुकीसाठी केवळ पैसा नाही, तर श्रमही तितकेच महत्त्वाचे आहेत. उमेदवारांचा पदयात्रेपेक्षा घरोघरी जाण्यावर भर असतो. प्रत्येकाच्या घरी जाण्यासाठी मजले चढावेच लागतात. यावेळी तब्बल चार वर्षांच्या मोठ्या कालावधीनंतर मुंबई महापालिकेची निवडणूक होत असल्यामुळे प्रत्येक उमेदवाराला नागरिकांशी तुटलेला संपर्क वाढवावा लागत आहे. त्यामुळे उमेदवारांची चांगलीच दमछाक होताना दिसून येत आहे. त्यामुळे अनेक उमेदवारांनी थकवा घालवण्यासाठी मालिशवाल्यांची नियुक्ती केली आहे.
दुपारी दोन वाजता प्रचार संपल्यानंतर किंवा रात्री प्रचार संपल्यानंतर उमेदवारांकडून किमान तासभर मसाज करून घेतले जात आहे. महिला उमेदवार ब्युटी पार्लरवाल्यांकडून मसाज करून घेत आहेत. त्यामुळे पुन्हा सकाळी नव्या जोमाने उमेदवार प्रचाराला फिरताना दिसून येत आहेत. या मसाजसाठी दररोज आठशे ते एक हजार तर काही ठिकाणी दीड ते दोन हजार रुपये मोजले जात आहेत. यातील बहुतांश मालिशवाले हे कुठे ना कुठे सलूनमध्ये काम करत आहेत. त्यामुळे सध्या त्यांची चांगली कमाई होत आहे.