मुंबई: एल निनोच्या पार्श्वभूमीवर जलसंधारण तसेच जलयुक्त शिवार अभियान अंतर्गतची कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्यात यावीत. तसेच भूजल पातळी कमी झालेल्या ठिकाणी प्राधान्याने कामे करून तेथील भूजल पातळी वाढविण्यासाठी प्रयत्न करावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
फडणवीस यांनी वर्षा निवासस्थानी मृद व जलसंधारण विभागाचा आढावा घेतला. जलसंधारण, जलयुक्त शिवारमधील कामांचे प्राधान्य ठरवून ती पूर्ण करण्यात यावीत. तसेच जलयुक्त शिवार 2.0 अंतर्गत समाविष्ट गावांमध्ये दुरुस्तींच्या कामांची निकड पाहून ही कामे आराखड्यात समाविष्ट करून तातडीने पूर्ण करावीत. जलयुक्तमधील राज्यस्तरीय आराखडे 15 मे पूर्वी मंजूर करण्यात यावेत, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले.
जलयुक्त शिवारची कामे हाती घेतलेल्या गावांबाहेरील 10 टक्के कामेही प्राधान्यक्रम ठरवून हाती घेण्यात यावीत. नाला खोलीकरणाची कामे करताना त्याठिकाणी पुन्हा गाळ होऊ नये, यासाठी नाल्याच्या ठिकाणी बांबू लागवड करण्याचा विचार करावा.
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत वाढीव निधी मिळण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांना भेटणार असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले. आतापर्यंत 15 लाख 15 हजार कामांपैकी 12 लाख 27 हजार संरचनांची स्थळ पडताळणी झाली आहे. गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार अंतर्गत यावर्षी 1435 जलसाठ्यातून 477.73 लक्ष घनमीटर गाळ काढण्यात आला आहे, अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.