मुंबई : राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपद स्वीकारणार असून बुधवारी ते उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. तथापि गृह किंवा नगरविकास खात्यासाठी त्यांचा हट्ट अद्याप कायम असल्याचे सूत्रांनी सांगितले. शिंदेंच्या हट्टामुळे भाजप नेतृत्व त्यांच्यावर नाराज असल्याचेही वृत्त आहे.
विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाचा हट्ट धरला होता. मात्र, भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने त्यास स्पष्टपणे नकार दिला होता. त्यानंतर शिंदे यांनी गृह आणि नगरविकास खात्यासाठी हट्ट धरला आहे. शिंदे मुख्यमंत्री असताना फडणवीस यांनी, गृह खाते स्वतःकडे ठेवले होते. त्यामुळे आपल्यालाही गृह खाते मिळावे, असा आग्रह शिंदे यांनी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडे धरला आहे. शिंदे यांच्या या हट्टामुळे महायुतीचे सरकार स्थापन होण्यास विलंब होत आहे. आता भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने शिंदे यांच्याशी संवाद साधणे बंद केले असून शपथविधीची तारीख परस्पर जाहीर केली. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने शिंदे यांना एकप्रकारे इशारा दिला आहे. त्यामुळे शिंदे यांनी अखेर उपमुख्यमंत्रिपद स्वीकारण्याचे ठरविले आहे.
भाजपची ज्या राज्यांमध्ये सत्ता आहे, तेथे गृह खाते मुख्यमंत्र्यांकडे असते. महाराष्ट्रातही 1995 तसेच 2014 आणि 2022 मध्ये गृह खाते भाजपने घेतले होते. गृह खाते देण्यास भाजपने नकार दिला आहे. तसेच नगरविकास खात्याबाबत अजून निर्णय झालेला नाही. शिंदे यांचा रुसव्यामुळे महायुतीच्या प्रतिमेवर परिणाम होत आहे. त्यामुळे आता पुरे, असा पवित्रा भाजपचा आहे. भाजप आणि शिंदे यांच्या संघर्षात अजित पवार यांनी वेळ न घेता भाजपला मुख्यमंत्रिपदासाठी पाठिंबा जाहीर केल्याने त्यांच्यावर भाजपचे नेतृत्व खूश आहे. त्यामुळे त्यांना काही चांगल्या खात्यांची बक्षिसी मिळू शकते.
मी उपमुख्यमंत्री होणार यात कोणतेही तथ्य नसून त्यासंदर्भात प्रसिद्ध होत असलेल्या बातम्या निराधार आणि बिनबुडाच्या आहेत, अशी पोस्ट एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी सोशल मीडियावर टाकली आहे. उपमुख्यमंत्रिपद नव्हे तर कोणत्याही मंत्रिपदाच्या शर्यतीत मी नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.