Eknath Shinde vs Uddhav Thackeray
मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्यासाठी एमआयएमला काय ते पाकिस्तानला ही सोबत घेतील, अशी घणाघाती टीका शिवसेना नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आज (दि.११) केली.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दक्षिण मध्य मुंबईतील निवडणूक तयारीचा सविस्तर आढावा घेतला. याआधी त्यांनी उत्तर पश्चिम मुंबईतील स्थितीची पाहणी केली होती. या बैठकीत एकूण सहा विधानसभा क्षेत्रांचा समावेश असून, प्रत्येक वॉर्डनुसार स्वतंत्र बैठकांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
शिंदे म्हणाले, “या बैठकीत पदाधिकारी नेमणुका, मतदार यादी आणि निवडणुकीची तयारी याचा सविस्तर आढावा घेतला जाईल. निवडणुका शिवसेनेसाठी नवीन नाहीत. आम्ही पूर्वीप्रमाणेच संघटितपणे लढू. मुख्यमंत्री असताना आम्ही मुंबईतील रस्त्यांचे काँक्रीटीकरण केले, रखडलेले प्रकल्प मार्गी लावले, आणि ‘आपला दवखाना’ ही योजना सुरू केली. या सर्व उपक्रमांमुळे मुंबईच्या विकासाला गती मिळाली.
मुंबई हे जागतिक शहर आहे. ब्रिटनचे पंतप्रधान मुंबईत आल्यावर त्यांनी काही महत्त्वाचे करारही केले. यावरून मुंबईचं आंतरराष्ट्रीय स्तरावरचं स्थान किती मोठं आहे हे स्पष्ट होते. आम्ही केलेल्या कामांची पोचपावती विधानसभेत मिळाली आणि तीच कामगिरी मुंबई महापालिका निवडणुकीतही दिसून येईल. पद एक असतं, उमेदवारी एक असते; मात्र पक्षाच्या विविध महामंडळे, जिल्हा समित्या, संस्थांमधून कार्यकर्त्यांना नक्कीच संधी मिळेल.