मुंबई : अजित पवारांच्या कामाची शैली वेगळी आणि प्रभावी होती. ते अत्यंत अभ्यासू होते, प्रशासनावर त्यांची पकड होती. कामातील शिस्त आणि काटेकोरपणा हे त्यांच्या स्वभावाचे भाग होते. राजकारणात मतभेद आणि वाद असले तरी अजित पवार हे अजातशत्रू होते. राजकारणात त्यांनी खिलाडूपणा जपला होता. मी मुख्यमंत्री असताना त्यांनी माझे जाहीर कौतुकही केले होते. परंतु, दुर्दैवाने दादांना मुख्यमंत्री होता आले नाही. नशिबाची साथ मिळाली असती तर भविष्यात दादा नक्कीच मुख्यमंत्री झाले असते, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात झाली. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधान परिषदेत सभागृहाचे नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवार यांचा शोकप्रस्ताव मांडला.
शिंदे म्हणाले, लाखांचा पोशिंदा जावा आणि लाखो लोक अनाथ व्हावेत, अशीच काहीशी अवस्था अजितदादांच्या जाण्याने झाली आहे. दादा, राजकारणात आपण घेतलेले अनेक निर्णय अचूक होते हे जनतेच्या न्यायालयाने सिद्ध केले आहे, पण तुमचा हा जगाचा निरोप घेण्याचा निर्णय मात्र चुकला आहे. तो मागे घ्या आणि परत या, अशा भावुक शब्दांत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी श्रद्धांजली वाहिली.
अजितदादांच्या आठवणींना उजाळा देताना शिंदे म्हणाले, मी, देवेंद्रजी आणि अजितदादा म्हणजे राज्याच्या स्थैर्याचा एक भक्कम ट्रँगल ऑफ स्टॅबिलिटी होतो. आम्ही तिघे एकत्र आलो म्हणून महाराष्ट्राची भूमिती आणि प्रगती वेगाने सुरू होती. 28 जानेवारीच्या त्या काळ्या दिवसाने आमचा हा आधार हिरावून नेला. दादा वेळ कधीच चुकवत नसत, पण त्या दिवशी नियतीने मात्र घात केला. टीव्हीवर त्या अपघाताची दृष्ये पाहिली आणि मनाचा थरकाप उडाला, अशी आठवण त्यांनी सांगितली.
11 वेळा राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम दादांच्या नावावर होता. दादा बाहेरून फणसासारखे कडक वाटत असले तरी आतून ते अत्यंत मृदू मनाचे होते. लाडकी बहीण योजनेसाठी 46 हजार कोटींची तरतूद करताना त्यांनी अर्थकारणाचा समतोल उत्तम राखला होता. दादांनी पाहिलेले विकासाचे स्वप्न पूर्ण करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. विकास आता लांबणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही ही दादांची घोषणा आम्ही सत्यात उतरवू, असा निर्धार उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला.
अजितदादांच्या आठवणींनी वरिष्ठ सभागृह गहिवरले
एका मोठ्या वृक्षाच्या सावलीतून बाहेर पडत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्रात स्वत:ची ओळख निर्माण केली होती. घड्याळ आणि दादांचे अतूट नाते होते. घड्याळाच्या काट्याप्रमाणे त्यांचा कारभारही शिस्तीचा होता. दादा म्हणजे स्पष्टवक्तेपणा आणि वक्तशीरपणाचे प्रतीक होते. गेली अनेक वर्षे त्यांनी राज्याचे अर्थखाते सांभाळले होते, अर्थसंकल्पही तेच मांडत होते. पण आज अर्थसंकल्पीय अधिवेशनात दादांनाच श्रद्धांजली वाहण्याची वेळ येते, हे अत्यंत वेदनादायी आहे. अजितदादांच्या निधनाने राज्यावर दु:खाचा डोंगर कोसळला असला तरी त्यांच्या जाण्याने एक भरवशाचा नेता आणि दिलदार मित्र गमावला गेला, अशा शब्दांत विधान परिषदेत सर्वपक्षीय सदस्यांनी दादांच्या आठवणींना उजाळा देत त्यांना श्रद्धांजली वहिली.
अजित पवार यांच्यासह माजी मंत्री सुरुपसिंह नाईक, आमदार अशोक मोडक, गंगाधर पटने, नीला देसाई या दिवंगत सदस्यांना विधान परिषदेत सर्वपक्षीय सदस्यांकडून श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी दिवंगत अजित पवार यांना श्रद्धांजली वाहताना अनेकांच्या भावना दाटून आल्या. दादांच्या आठवणींना उजाळा देताना विधान परिषदेचा सभागृह गहिवरून गेला होता. सभापती राम शिंदे, उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी मुख्यमंत्री व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, विधान परिषदेतील भाजपचे गटनेते प्रवीण दरेकर, चित्रा वाघ, प्रसाद लाड, निरंजन डावखरे, काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार विक्रम काळे, अमोल मिटकरी, संजय खोडके, शरद पवार गटाचे आमदार शशिकांत शिंदे, काँग्रेसचे भाई जगताप, अभिजीत वंजारी, शिंदे गटाच्या आमदार मनीषा कायंदे, ठाकरे गटाचे सचिन अहिर, आदी सदस्यांनी दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली वाहताना आपल्या भावना व्यक्त केल्या.