मुंबई: अयोध्येतील श्रीराम मंदिरात चोरी झाली याची रामभक्तांना वेदना आहे. ज्यांनी हे केले त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जेलमध्ये पाठवतील. पण ज्यांनी आपल्या सिद्धिविनायक मंदिरातील दानपेटी लुटली त्यांचे हिंदुत्व कोणते? अशी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी ठाकरे गटावर केली.
आघाडीचे सरकार असताना सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टवर कोण होते. तेव्हा दानपेटीवर डल्ला मारला गेला. पुरावे आहेत म्हणून बोलत आहे. सिद्धिविनायकला धोके आणि यांना खोके असा टोला शिंदे यांनी लगावला.
विरोधकांनी मांडलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावाला शिंदे यांनी उत्तर दिले. हिंदुत्व हे रक्ताच्या कणात असायला लागते, असे ते म्हणाले. सत्ता असताना दाम आणि सत्ता गेल्यावर राम अशी यांची अवस्था झाली आहे. हनुमानाने मशालीने लंका दहन केली असा नवा शोध यांनी लावला आहे, असा टोला शिंदे यांनी ठाकरे गटावर लगावला.
मिसिंग लिंक प्रकल्पात पैसे खाल्ले असा आरोप आमच्यावर केला जात आहे. मिसिंग लिंकला कोणताही धोका नाही. पण प्रवेशद्वारावर दरड कोसळल्याने किती आकांडतांडव केले जात आहे. प्रकल्पाची बदनामी ही मुख्यमंत्र्यांची बदनामी नाही.
ती राज्याची बदनामी आहे. राज्याचे शत्रू ही राज्याची बदनामी करत नाहीत, पण विरोधक करत आहेत. हा महाराष्ट्रद्रोह नाही का? असा सवाल त्यांनी केला. मिसिंग लिंक प्रकल्पाच्या किमतीत केवळ १० टक्के वाढ करण्यात आली, असे त्यांनी स्पष्ट केले.
माझ्या दालनात शरद पवार आले आणि मी त्यांचा सन्मान केला म्हणून यात यांच्या पोटात दुखू लागले. देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार या लोकांनी केला तेव्हा मी देवेंद्र फडणवीस यांना विचारले नाही. आमच्यात काड्या करण्याचा प्रयत्न केला तरी आमचे संबंध चांगलेच राहतील. निर्मळ पाण्यासारखी देवेंद्र आणि माझी दोस्ती आहे, असे शिंदे यांनी सांगितले.
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना घरी बोलावून सत्कार करतात…
कर्नाटक सीमा प्रश्नावर विधान भवनात बैठक झाली. कर्नाटक सरकार किती सीमा भागातील मराठी बांधवांवर अन्याय करत आहे, ही व्यथा तेथील आपले मराठी बांधव मांडत आहेत. मराठीत बोर्ड लावू दिले जात नाहीत. कागदपत्रे देत नाहीत. पण त्याच कर्नाटकच्या मुख्यमंत्र्याला घरी बोलावून शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार केला जातो. बाळासाहेब ठाकरे असते तर असे केले नसते, असे भाष्य शिंदे यांनी केले.
मुंबईतील मेगा काँक्रीट रस्ते प्रकल्पांतर्गत आतापर्यंत ५७५ किलोमीटर रस्त्यांची कामे पूर्ण झाली असून प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर शहरातील ९३ टक्के रस्ते काँक्रीटचे असतील. 'मिसिंग लिंक' आणि 'अटल सेतू'सारख्या प्रकल्पांमुळे वाहतूक सुलभ झाली असून मेट्रो नेटवर्कमधून दररोज लाखो प्रवासी प्रवास करत असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.
राज्यात गंभीर गुन्ह्यांमध्ये घट होत असून गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण वाढले आहे. महिला सुरक्षा, सायबर गुन्हे आणि अमली पदार्थांविरोधात शासनाने झिरो टॉलरन्स धोरण स्वीकारले आहे. सायबर आर्थिक फसवणुकीतील नागरिकांचे हजारो कोटी रुपये वाचविण्यात महाराष्ट्र सायबरला यश आले असून, आंतरराष्ट्रीय स्तरावरही या प्रकल्पाचा गौरव झाला असल्याचे त्यांनी सांगितले. विकासकामांमध्ये सोशल
आणि टेक्नॉलॉजी ऑडिट…
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विकासकामांमध्ये गुणवत्ता, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढविण्यासाठी सोशल अँड टेक्नॉलॉजी ऑडिट यंत्रणा लागू करण्यात येत आहे. जिओ-टॅगिंग, जीआयएस मॅपिंग, कृत्रिम बुद्धिमत्ता तसेच नागरिकांच्या सहभागातून विकासकामांचे स्वतंत्र मूल्यमापन करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
मी दोषी आढळलो तर फासावर चढवा : बांदेकर
सिद्धिविनायक मंदिराच्या यंत्रणेमध्ये जे कार्यकारी अधिकारी असतात, ते मंत्रालयातून नियुक्त केले जातात. त्याचबरोबर वित्तीय अधिकारी देखील मंत्रालयानेच नियुक्त केलेला असतो. त्यामुळे शासकीय कारभारात किंवा या बाबतीत कोणताही गैरव्यवहार आढळला असेल तर, एकनाथ शिंदे यांनी जाहीर करायला हवे, या गैरव्यवहाराची चौकशी करावी, त्यात मी दोषी आढळलो तर त्याच मंदिरासमोर मला फासावर द्या, असे आव्हान सिद्धिविनायक ट्रस्टचे माजी अध्यक्ष आणि शिवसेना नेते आदेश बांदेकर यांनी दिले.
बांदेकर म्हणाले, माझा कार्यकाळ संपून 3 वर्षे होऊन गेलेली आहेत. आता 3 वर्षांत जे कुणी तिथे पदाधिकारी आहेत, त्यांच्याचकडे सगळा कारभार होता. त्यांनी काही कागदात फेरफार केले असतील, तर त्याची चौकशी होणे आवश्यक आहे. माझ्यावर उगाच खोटे आरोप करु नका. कारण सगळ्याच गोष्टी वेळोवेळी स्पष्टपणे जाहीर केल्या आहेत.