Eknath Shinde: सात तासांत राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचता येणार Pudhari Photo
मुंबई

Eknath Shinde: सात तासांत राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचता येणार

5 हजार किलोमीटरचे अ‍ॅक्सेस रस्ते आणि 18 नोड तयार करणार : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ‘महा’रोडमॅप

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : पायाभूत सुविधा आणि रस्ते कनेक्टिव्हिटी याशिवाय राज्यभरात उद्योगाला चालना मिळणार नाही, ग्रामीण भागाचा विकास होणार नाही, हे ओळखून राज्याच्या कुठल्याही कानाकोपर्‍यातून कुठेही सात तासांत पोहचण्यासाठी राज्यभरात पाच हजार किलोमीटर अ‍ॅक्सेस रस्ते बनविले जाणार असून त्याचे 18 नोड तयार केले जाणार असल्याचा ‘महा’रोडमॅप उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडला. पुढारी न्यूजच्या दुसर्‍या वर्धापन दिनानिमित्त मुंबईतील वरळी येथील एनएससीआय सभागृहात आयोजित पुढारी न्यूज महासमिट : 2025 मधील विचारमंथन विकासाचे, स्वप्न नव्या महाराष्ट्राचे या कार्यक्रमाच्या समारोपाप्रसंगी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सरकारचे व्हिजन मांडले.

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, महाराष्ट्र ही संतांची, वीरांची, शिवरायांची भूमी आहे. आता समाजकारण बदलतेय, समाजाचे प्रश्न बदलतात, काळानुसार निर्णय घ्यावे लागतात, ते आत्मसात करावे लागतात. गेल्या अडीच वर्षांत खूप प्रकल्प सुरू करण्यात आले. ते आता पुढे नेले जात आहेत. मागील सरकारने राज्यातील विकास प्रकल्प थांबवले होते. त्यावर स्थगिती दिली होती. त्यामुळे विकासाचा वेग मंदावला होता. त्या सर्व स्थगित्या काढून टाकल्या, स्पीड ब्रेकर हटवून मुख्यमंत्री पदाच्या अडीच वर्षांच्या कारकिर्दीत मेट्रो, कारशेड, कोस्टल रोडला गती दिली.

कोस्टल रोडची सुरुवात मुंबई महापालिकेने केली, पण महायुती सरकारने कोस्टल रोडच्या कामाला गती दिली आणि तो सुरू केला. मी श्रेयवादासाठी काम करीत नाही, असे सांगून शिंदे यांनी कुठल्याही कामाचे श्रेय घेणे माझ्या रक्तात नसल्याचे स्पष्ट केले. मुंबईतील अटल सेतू हा पर्यावरणपूरक असा बनविला आहे. या सेतूमुळे फ्लेमिंगो पळून जातील असा आक्षेप पर्यावरणप्रेमींनी घेऊन विरोध केला होता. मात्र सरकारने सेतूची निर्मिती करताना पर्यावरण लक्षात घेऊन यशस्वीपणे काम केले आणि आक्षेप घेतलेल्या त्या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात फ्लेमिंगो कमी नव्हे, तर वाढले असल्याचा अहवाल दिला. हिंदुहृदयसम्राट दिवंगत बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग निर्माण करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रकल्प एमएसआरडीसीकडे सुपूर्द केला.

ते म्हणाले, तुम्ही फिल्डवर जाऊन काम करा. म्हणालो, मी फील्डवरचाच माणूस आहे. बुलढाण्याच्या शेतकर्‍यांचा विरोध पाहून त्यांना जाऊन भेटलो आणि बुलढाण्याच्या शेतकर्‍यांनी मोबदल्याबाबत मागच्या प्रकल्पाचा अनुभव सांगितला. जमीन देण्यास ते तयार नव्हते. तेव्हा या मोबदल्याची जबाबदारी मी स्वतः घेतो आणि तुम्हाला दोन दिवसांत मोबदला तुमच्या खात्यामध्ये पोहोचेल असे आश्वासित केले. एवढेच नाही तर त्यांच्या करारनाम्यावर देखील साक्षीदार म्हणून मंत्री असतानाही मी सही केली आणि त्यांच्यात विश्वास निर्माण झाला. मुंबईला पोहचलो आणि त्या शेतकर्‍यांच्या खात्यात मोबदला पोहचला. सरकारबाबत विश्वास निर्माण केल्यानंतर समृद्धी महामार्ग तयार झाला. वन्य प्राणी आणि वनसंपदेचे नुकसान होऊ नये यासाठी खास काळजी घेण्यात आली. त्यासाठी अधिकचे 300 कोटी रुपये खर्चून उपाययोजना राबविण्यात आल्या आणि वन्य प्राणी व वनसंपदा सुरक्षित करण्यात आले. आज तिथे पूर्वीप्रमाणेच वन्यप्राण्यांचा वावर दिसून येतो, असेही शिंदे म्हणाले.

पालघर जिल्ह्यातील वाढवण येथे तिसरे एअरपोर्ट बनविण्याचे काम सुरू असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निधी उपलब्ध करून दिला आहे. वसई विरार - अलिबाग कॉरिडॉरचं काम सुरू झालेले आहे. मुंबई -गोवा महामार्ग 90% पूर्ण झाला असून तो पूर्णत्वाकडे जात आहे. चार-पाच ठेकेदारांमुळे या रस्त्याचे लटकले. मी मुख्यमंत्री असताना या रस्त्याच्या कामाची पाहणी करण्यासाठी गेलो होतो. तेव्हा कशेडी बोगद्याची एक बाजू सुरू झाली होती. गणपती उत्सव असल्याने दुसरी लेन सुरू न झाल्यास मोठी गैरसोय होणार होती. तेव्हा मी पाच मीटरचे रेडीमेड रस्त्याचे 150 पीस तयार त्या बोगद्यामध्ये टाकले आणि तीन दिवसांमध्ये बोगद्याची दुसरी लेनही चाकरमान्यांसाठी खुली करण्यात आली. एवढे बारीक बारीक लक्ष ठेवून काम केले आहे आणि कामं करावी लागतात. त्यातूनच विकासाला वेग मिळत असतो, असे शिंदे म्हणाले.

मुंबईतील वरळी सीलिंक रस्ता हा थेट वर्सोवाला जोडून पुढे तो भाईंदर तसेच विरारला जोडण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. मुंबईतील एक्सप्रेस वे हा पुढे ठाण्यापर्यंत नेऊन तो पुढे कोस्टलमार्गे फाउंटनला जोडला जाईल. त्यामुळे थेट मुंबईतील वाहने अहमदाबादला जातील. त्यामुळे लोकांचा वेळ वाचेल आणि वाहतूक कोंडीतून मुक्तता होईल. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शिवसेना-भाजप युतीच्या काळामध्ये 55 उड्डाणपूल उभारले होते. तेव्हा लोक म्हणायचे, एवढ्या पुलांची काय गरज आहे? पण आता या पुलांची गरज आपल्या लक्षात येते. पायाभूत सुविधा वाढल्या तर विकासाला चालना मिळते. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबई -पुणे एक्सप्रेसची निर्मिती केली. यामुळे पुण्याचा कायापालट झाला. सर्विस सेंटरपासून अनेक इंडस्ट्री उभ्या राहिल्या. त्याच मुंबई-पुणे एक्सप्रेसवर जगातील सर्वात रुंद टनेल बांधण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. रस्त्याच्या हजार मीटर खालून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापरून बोगदा तयार केला जात आहे. हे एक आश्चर्यच असणार आहे, असे शिंदे यांनी सांगितले.

माझ्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये हाऊसिंग क्लस्टर आणले. झोपडपट्टीतील गोरगरिबांना चांगले घर मिळावे, त्यांना चांगल्या सुखसुविधा मिळाव्या यासाठी क्लस्टर योजना राबविल्या जात आहेत. एसआरएच्या स्कीममध्ये क्लस्टर योजना राबवून मोठ्या प्रमाणावर नागरिकांना चांगली घरे, सुखसुविधा दिल्या जातील. गिरणी कामगार, विधवा, पोलिसांना घरे मिळतील. होस्टेल्स उभारणीचे काम सुरू झालेे असून सिटी विथ इन डेव्हलप सिटी अशी संकल्पना राबवून लोकांचे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढवण्याचे प्रयत्न आम्ही गेल्या अडीच वर्षात केले असून तेच काम पुढे आताही चालू असल्याचे शिंदे म्हणाले.

महाराष्ट्र हा परदेशी गुंतवणूकमध्ये पहिल्या क्रमांकावर असून देशातील एकूण गुंतवणुकीपैकी 40 % गुंतवणूक ही महाराष्ट्र राज्यात झाली आहे. जीडीपीत देखील राज्य वरच्या क्रमांकावर आहे. मुख्यमंत्री असताना पहिल्यांदा जेव्हा दावोसला गेलो होतो तेव्हा चार लाख कोटीचे एमओयू साइन केले. तेव्हा तिथल्या मंडळींनी विचारले की, मोदी सरकारशी तुमचे कसे सबंध आहेत?तेव्हा म्हणालो, आम्ही त्यांचीच माणसे आहोत. दुसर्‍या वर्षी देखील गुंतवणूकदारांनी चांगला प्रतिसाद दिला. आता मुख्यमंत्री फडणवीस यांनी पंधरा लाख कोटींच्या करारावर सह्या केल्या आहेत. उद्योगाला विश्वास असावा लागतो, त्याची कामे पटकन व्हावी लागतात म्हणून सिंगल विंडो क्लिअरन्स देत आहोत. त्यांच्या कामात कुणी अडचणी आणण्यास त्याचा कार्यक्रम केला जाईल, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.

आमच्या लाडक्या बहिणीने गेम चेंजरची भूमिका निभावली. लाडकी बहीण योजनेमुळे विरोधी पक्ष जो बाशिंग बांधून बसला होता, हॉटेल बुक केले होते, त्यांचे बुकिंग लाडक्या बहिणींनी रद्द केले. विधानसभेत असा हा चमत्कार घडलेला आहे. सर्वसामान्य लोकांचे सरकार आहे. त्यांच्यासाठीच हे सरकार काम करतेय. लाडकी बहीण योजना आणली तेव्हा मला म्हणायचे पैसे कुठून देणार. मात्र आम्ही योजना सुरू केली, दोन महिन्यांचे पैसे बहिणींच्या खात्यात जमा केले. आचारसंहितेत योजना अडकू नये याकरिता आम्ही आचारसंहितेच्या अगोदर दोन महिन्यांचे आगाऊ पैसे जमा केले होते. त्यामुळे या बहिणींनी आम्हाला सरकारमध्ये बसविले. ज्या विरोधकांना घरी बसवण्याचे काम लाडक्या बहिणींनी केले अशा लाडक्या बहिणींची ही योजना कधीच बंद करणार नाही, असे शिंदे यांनी आश्वासित केले. उच्च शिक्षणाला वडिलांकडे पैसे नाहीत म्हणून एका मुलीने आत्महत्या केल्याची बातमी समजताच सरकारने मुलींना मोफत उच्च शिक्षणाची योजना सुरू केली. अशा अनेक लोकोपयोगी योजना आम्ही आखल्या आणि राबविल्या आहेत, असेही शिंदे म्हणाले.

अडीच वर्षात शेतकर्‍यांना 45 हजार कोटींची मदत

पैशाचे सोंग घेता येत नसल्याने शेतकरी कर्ज माफीही टप्प्याटप्प्याने करू. माझ्या मुख्यमंत्री पदाच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात कृषी क्षेत्रात 45 हजार कोटी रुपये विविध योजना, मदतीच्या रूपाने शेतकर्‍यांना दिले आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने कृषी क्षेत्रात बदल केले जात असून अनेक योजना राबविल्या जात आहेत, अशी माहितीही शिंदे यांनी दिली.

बदल घडविण्यासाठी डेडिकेशन असावे लागते आणि त्यातूनच चांगले काम होत असते. रोजगार निर्मितीसाठी स्किल डेव्हलपमेंटचे काम हाती घेण्यात आले असून टाटा आणि जिल्हा प्रशासनामार्फत केंद्र उभारून तरुणांना प्रशिक्षण दिले जात आहे. कल्याण, पुण्यासारख्या ठिकाणी टाटा व राज्य सरकारने सुरू केलेल्या स्किल केंद्रांप्रमाणे राज्यात केंद्र उभारली जातील. बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे, नोकरी करण्यापेक्षा नोकरी देणार्‍याचे हात तयार करा. त्या दृष्टिकोनातून सरकार काम करतेय. आम्ही पायाभूत सुविधांवर जास्तीत जास्त काम करून राज्याची प्रगती वेगाने होण्यासाठी प्रयत्न करत आहोत. घर चालवताना ज्याप्रमाणे कसरत करावी लागते तशी कसरत सरकार चालवताना नेहमी करावी लागते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आशीर्वाद आणि त्यांची मदत नेहमीच राज्य सरकारला मिळाली आहे. मंत्री नितीन गडकरी हा चांगला माणूस आहे, ते बोलतात ते करतात असे म्हणून शिंदे यांनी मोदी आणि गडकरी यांचे आभार मानले.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रथम शंभर दिवस कृती आराखडा आणि आता दीडशे दिवसांचा कृती आराखडा तयार केला, त्याचे चांगले रिझल्ट आपल्याला दिसत आहेत. त्यासाठी शासन आणि प्रशासन यांनी हातात हात घालून काम करायला हवे. शासन आपल्या दारी या उपक्रमाचा फायदा पाच कोटी लोकांना झाला, असेही शिंदे यांनी सांगितले.

देशात 2014 नंतर खर्‍या अर्थाने विकासाला सुरुवात झाली आहे. देश आर्थिक महासत्तेकडे वाटचाल करतोय. याचा सर्वांना अभिमान असला पाहिजे. मात्र विरोधक बाहेर जाऊन देशाची बदनामी करतात. लष्कराच्या शौर्यावर संशय व्यक्त करतात, याचे खूप वाईट वाटते असे म्हणत शिंदे यांनी विरोधकांवर टीका केली. मी पातळी सोडून बोलत नाही आरोपाला, टीकेला कामातून उत्तर देतो. विधानसभेमध्ये 80 जागा लढवल्या आणि 60 जागा जिंकलो आहे. शांत राहून काम करतो, कमी बोला आणि जास्त काम करा, जास्तीत जास्त ऐकून घ्या आणि काम करा असे म्हणत शिंदे यांनी नाव न घेता संजय राऊत यांचा समाचार घेतला.

मुख्यमंत्री असतानाही कार्यकर्ता म्हणून मी काम करत राहिलो. ते पुढे सुरूच राहणार असून लाडका भाऊ म्हणून मला मिळालेली नवीन ओळख याचा आनंद होत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पुढारी हे संवेदनशील आणि जनतेबद्दल आपुलकीच्या भावनेने काम करणारे दैनिक असून पद्मश्री बाळासाहेब जाधव यांच्याशिवाय कुठलेही वर्तुळ पूर्ण होत नसून तेच मीडियातील खरे पुढारी असल्याचे गौरवोद्गार शिंदे यांनी काढले.

शिक्षणाचा दर्जा उंचावण्याचे काम सुरू

आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र सक्षमीकरणाकडे जास्त लक्ष दिले जात आहे. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना या माध्यमातून लोकांच्या घराजवळ उपचार दिले जात आहेत. नुकतीच राज्यातील एक कोटी महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली असता त्यामध्ये दहा हजारपेक्षा अधिक महिलांना कॅन्सर झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे आता गावागावात जाऊन महिलांची तपासणी केली जाईल, असेही ते म्हणाले. शिक्षणातही मोठ्या प्रमाणावर धोरण राबवून शिक्षणाचा दर्जा उंचावण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे खासगी शाळेतील विद्यार्थी जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये प्रवेश घेत असल्याचे शिंदे यांनी नाशिक जिल्ह्यातील शाळेचे उदाहरण देऊन सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT