मुंबई : महायुतीत विधानसभेच्या ८० च्या आसपास जागा लढविणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाची महायुतीत सर्वाधिक जागा जिंकण्याची महत्वाकांक्षा असून यासाठी राज्यभरात ४० अपक्ष उमेदवार उभे करून त्यांना रसद पुरविण्याची रणनीती आखली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आगामी विधानसभा निवडणुक लढविणार असल्याचे भाजपचे नेते सांगत आहेत. मात्र राज्यात महायुतीला बहुमत मिळाले तर शिंदे हेच मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असतील, असे जाहीर करण्यास भाजपच्या नेतृत्वाने नकार दिला आहे. मध्यंतरी एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. तेव्हा आपल्याला महायुतीच्या मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून जाहीर करावे, आपण पुन्हा महायुतीला जिंकून आणेन, असा प्रस्ताव दिला होता. परंतु सदर प्रस्ताव भाजपने नाकारला आहे. त्यामुळे शिंदे यांनी, विधानसभेच्या निकालात आपला गट आमदार संख्येचा जादुई आकडा कसा आणेल, याची आखणी केली आहे. जेथे शिंदे गटाचे आमदार आहेत तेथे मतविभागणीसाठी काही अपक्ष उमेदवार उभे केले जातील. मात्र जे अपक्ष उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे त्यांना आपल्या गटाच्या उमेदवार जेथे नसतील तेथे ताकद दिली जात आहे. हे अपक्ष उमेदवार भाजप आणि अजित पवार गटाचे उमेदवार उभे असतील त्या काही मतदारसंघात निवडणुकीच्या रिंगणात उभे असलेले दिसतील. याचा फटका भाजप आणि अजित पवार गटाच्या उमेदवारांना बसू शकेल. शिंदे गटाने केलेल्या सव्र्व्हेत भाजप आणि अजित पवार गटाच्या आमदारांची सध्याची संख्या घटेल, असे निष्कर्ष काढण्यात आले आहेत. त्यामुळे शिंदे यांचा लाभ घेण्याचा प्रयत्न करत आहेत. याबाबतची भाजपच्या नेतृत्वाला कल्पना आली आहे. अजित पवार यांना महायुतीतून बाजूला सारून भाजप आणि शिंदे गट अशी युती निवडणूक लढविण्याचा विचार सुरू होता. पण ऐन निवडणुकीच्या तोंडावर हा निर्णय आत्मघातकी ठरू शकेल, असे भाजपच्या नेतृत्वाला वाटत आहे.
दुसरीकडे, स्वतःचा पक्ष काढून तो कसा टिकवायचा याची दीक्षा एकनाथ शिंदे यांनी शरद पवार यांच्याकडून आतापर्यंत झालेल्या भेटीत घेतली असल्याचे सांगितले जात आहे. जर भाजपने ८० जागांपेक्षा कमी जागा जिंकल्या तर महायुतीचे सरकार येणे अवघड आहे. यासाठी आगामी सरकारच्या सारीपाटात तिरकस चाल करणारा उंट आपण कसे बनू शकतो, याची गणिते शिंदे यांनी मांडली आहेत. आघाडीत शरद पवार गटाला शिंदेच्या आमदारांची संख्या वाढली तरी चालेल पण अजित गटाचे आमदार कमी झाले पाहिजेत हे शरद पवार यांचे गणित आहे. त्यामुळे हे शिंदेंच्या पथ्यावर पडू शकते.