शिवसेना फोडाफोडीचा दुसरा अंक तेजीत file photo
मुंबई

Maharashtra politics | शिवसेना फोडाफोडीचा दुसरा अंक तेजीत

शिंदेसेना आणि उद्धवसेनेतील संघर्ष आता आणखी वाढणार

मोहन कारंडे

दिलीप सपाटे, मुंबई

शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रिपदावरून पायउतार झाल्यानंतर पक्षवाढीच्या कामाला लागले आहेत. त्यांनी नव्या दमाने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला धक्के द्यायला सुरुवात केली आहे. उद्धवसेनेचे माजी आमदार राजन साळवी आणि सुजित मिणचेकर यांना एकनाथ शिंदे यांनी नुकताच पक्षप्रवेश देऊन मोठा धक्का दिला आहे.

राजन साळवी हे शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेल्या रत्नागिरी जिल्ह्यात आमदार होते. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडली तेव्हाच राजन साळवी हे त्यांच्यासोबत जाणार असल्याची चर्चा होती; मात्र साळवी यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली नाही. त्याची किंमत त्यांना चुकवावी लागली. त्यांना काही भ्रष्टाचाराच्या आरोपांना आणि चौकशीलाही सामोरे जावे लागले. त्यांना अटक होते की काय, अशी स्थिती निर्माण झाली होती; मात्र कारवाई थांबली. तथापि, राजन साळवी यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर राजकारणात बाजूला पडलेले साळवी शिंदेसेनेत सामील झाले. त्यामुळे उद्धवसेनेला मोठा धक्का बसला.

कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेनेचे माजी आमदार सुजित मिणचेकर यांनीही उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आहे. त्यांनी शिंदेसेनेचा भगवा हाती घेतला आहे. कोल्हापूरमध्येदेखील शिवसेनेला नेहमी चांगले यश मिळत आले आहे; मात्र विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंची शिवसेना की एकनाथ शिंदे यांची शिवसेना? यामध्ये कोल्हापूरकरांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पाठिंबा दिला. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची ताकद घटली आहे. अशावेळी सुजित मिणचेकर यांनी आपले राजकीय भवितव्य सुरक्षित करण्यासाठी शिंदेसेनेला जवळ केले आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या राजकीय मंचावर फोडाफोडीचा दुसरा अंक सुरू केला आहे. अपक्ष आमदार शरद सोनवणे यांनाही एकनाथ शिंदे यांनी पक्षात घेतले आहे.

शिंदेसेना आणि उद्धवसेनेत असलेला हा संघर्ष आता आणखी वाढत जाणार आहे. मुंबई महापालिकेतील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या पन्नासपेक्षा जास्त माजी नगरसेवकांना एकनाथ शिंदे यांनी गळाला लावले आहे. मातोश्रीशी कायम निष्ठावान राहिलेल्या राजूल पटेल यांच्यासारख्या माजी नगरसेवकांनीही उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आहे. विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर महायुतीचे टार्गेट हे महापालिका निवडणूक आहे. विशेषतः मुंबई महापालिका जिंकण्यासाठी भाजप आपली सर्व शक्ती पणाला लावणार हे स्पष्ट आहे. निवडणुकीआधी उद्धव ठाकरे यांचा पक्ष खिळखिळा करण्यासाठी भाजप दुसर्‍या बाजूला एकनाथ शिंदे यांची ताकद वापरत आहे. त्यामुळे येणार्‍या काळात दोन्ही शिवसेनेतील वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे; मात्र दिवसेंदिवस पक्षाची शक्ती क्षीण होत चालल्याने उद्धव ठाकरे यांच्यापुढे शिंदेंचा मुकाबला करण्याचे आव्हान आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT