Eknath Shinde Pudhari
मुंबई

Eknath Shinde controversy : आता पुरे! आरोप-प्रत्यारोप विसरा... एकनाथ शिंदे यांनी वादावर टाकला पडदा

बांधावर जाऊन शेतकर्‍यांना मदत करण्‍याचे आदेश

रणजित गायकवाड

मुंबई : माजी मंत्री रामदास कदम यांनी ध्वनिफीत प्रकरणात भाजपवर केलेली टीका, मग प्रवीण दरेकर यांनी आम्ही शिंदेसाहेबांबद्दल काही बोललो आहोत का? तुम्ही फडणवीस यांच्यावर का बोलता, असा केलेला प्रतिप्रश्न, गणेश नाईक यांनी केलेला राजकीय भूकंपाचा खळबळजनक दावा, त्‍यावर गुलाबराव पाटलांनी मारलेली कोपरखळी अशा सत्तेतील दोन सहकारी पक्षांत सुरू झालेल्या कुरबुरींवर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढे येत पडदा टाकला आहे. एकमेकांवर सुरू असलेले आरोप-प्रत्यारोप पुरे झाले, आता थांबा आणि थेट दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीला बांधावर जा, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पक्षातील मंत्री, आमदार आणि पदाधिकाऱ्यांना दिले आहेत.

शिवसेनेने या वाक्युद्धावर बंदी घातली असताना भाजपचे नेतेही शांत बसतील काय याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी पुढे आणलेल्या ऑडिओ क्लिपनंतर शिवसेना आणि भाजप नेत्यांमध्ये आरोपांचे रण माजले होते. एकमेकावर आरोप-प्रत्यारोप करण्याची अहमहमिका सुरू झाली होती. आता ही कटुता टाळा आणि दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी पुढाकार घ्या, असे निर्देश शिंदे यांनी दिले आहेत. सत्ताधारी गटातील हा गोंधळ आता थांबतो का ते दिसेल.

भानावर या!

यासंबंधात जारी केलेल्या पत्रकात उपमुख्यमंत्री शिंदे म्हणतात, राज्यातील दुष्काळाची परिस्थिती अत्यंत गंभीर असून अशा कठीण काळात शेतकऱ्याला आधार देणे हे शिवसेनेचे प्रथम कर्तव्य आहे. शिवसेनेकडून दुष्काळग्रस्त भागांसाठी साडेतीन लाख धान्याची किट पाठवण्यात आली होती. ही मदत त्या त्या भागात पोहोचली असून ती थेट गरजू शेतकरी कुटुंबांपर्यंत पोहचवणे हे शिवसैनिकांचे कर्तव्य आहे.तिकडे लक्ष द्या.

राज्य सरकारकडून जाहीर होणारी मदत प्रत्यक्षात प्रत्येक गरजू शेतकऱ्यापर्यंत पोहोचते की नाही, याची कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करावी, असेही शिंदे यांनी सांगितलेे. शासकीय मदतीसाठी लागणारे अर्ज भरण्यापासून ते पंचनाम्यांच्या प्रक्रियेपर्यंत सर्व प्रशासकीय कामांत शिवसैनिकांनी शेतकऱ्यांना मदत करावी, असे शिंदे यांनी पक्ष पदाधिकाऱ्यांना सांगितले. शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी सर्वांनी एकदिलाने काम करावे असे आवाहन शिंदे यांनी शिवसेनेचे सर्व मंत्री, आमदार आणि कार्यकर्त्यांना केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT