मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्ली दौर्यावरून परतले असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बुधवारी अचानक दिल्लीला रवाना झाल्याने त्यांच्या या दौर्याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. ते दिल्लीत आपल्या शिवसेना पक्षाच्या खासदारांची तसेच अन्य राज्यातील प्रमुखांची बैठक घेणार आहेत. तसेच त्यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबतही चर्चा होणार असल्याचे कळते.
दिल्लीत सध्या संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना झाले आहेत. ते पक्षाच्या सर्व खासदारांसोबत बैठक घेणार आहेत. या बैठकीत अधिवेशनात काय काय मुद्दे मांडावे, याबद्दल ते मार्गदर्शन करणार आहेत. अन्य राज्यातील शिवसेना पदाधिकार्यांशीही ते चर्चा करणार असल्याची माहिती शिवसेनेच्या अधिकृत सूत्रांनी दिली.
दरम्यान, राज्यात मंत्री आणि आमदारांच्या गैरवर्तनाचा मुद्दा गाजत आहे. त्यात शिवसेना मंत्री आणि आमदारांची संख्या जास्त आहे. वादग्रस्त मंत्र्यांना समज देऊन या विषयावर पडदा टाकण्यात आला असला तरी सरकारची प्रतिमा मलिन होत आहे. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांच्यात चर्चा होऊ शकते. ही भेट कधी होणार हे कळू शकलेले नाही. शिंदे यांच्या एकूणच राजकीय गाठीभेटींबद्दल कमालीची उत्सुकता आहे.
राज्यात आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. या निवडणुका महायुती एकत्र लढणार असल्याची चर्चा असली तरी सर्वच ठिकाणी तीन पक्षांची युती होणे शक्य नाही. या निवडणुकांबाबतही दोन्ही नेत्यांत चर्चा होण्याची शक्यता आहे.