मुंबई : मी दिल्लीत जाऊन कोणती तक्रार केली नाही. तक्रार करण्याचा माझा स्वभाव नाही. माध्यमांनीच अंदाज बांधले. मला बिहारमधील शपथविधीसाठी बोलावण्यात आले होते. त्यासाठी मी दिल्लीमार्गे बिहारला गेलो होतो, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. आम्ही ‘एनडीए’चे घटकपक्ष आहोत. स्थानिक पातळीवरचे विषय मी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकत्र बसून सोडवत असतो, असेही ते म्हणाले.
भाजपने कल्याण-डोंबिवलीतील शिवसेना पदाधिकारी आणि माजी नगरसेवक फोडल्यानंतर नाराज झालेल्या एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे तक्रार केल्याचे बोलले जात होते. शिंदेंचे आमदारही भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मात्र, एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी विदर्भ दौऱ्यात एका वृत्तवाहिनीशी बोलताना महायुतीत बेबनाव असल्याचा स्पष्ट शब्दांत इन्कार केला.
महायुतीत कोणतीही नाराजी नाही. मी प्रचार करतोय. देवेंद्र फडणवीस, अजित पवार प्रचार करत आहेत. आम्ही प्रचारात आघाडीवर आहोत. काही ठिकाणी आमची भाजपशी युती आहे, तर काही ठिकाणी अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी युती आहे. लोकांना स्थानिक पातळीवरील विकास पाहिजे; पण मैत्रीपूर्ण लढतीत आम्ही एकमेकांवर टीका न करता सकारात्मक पद्धतीने प्रचार करत आहोत. विकासात्मक प्रचार करायचा असे आम्ही ठरवले आहे, असे शिंदे म्हणाले.
मित्रपक्षांतील पदाधिकारी, नेते यांचा भाजपमध्ये होत असलेला प्रवेश यावर बोलताना एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. पक्षप्रवेशाच्या मुद्द्यावर माझी मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली आहे. मुख्यमंत्र्यांनीदेखील त्यांच्या पक्षातील पदाधिकाऱ्यांना सांगितले आहे की, आपण मित्रपक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आपल्या पक्षात घेऊ नये. तसेच, मीदेखील महायुतीत मतभेद निर्माण होतील, असे काहीही करू नये, असे माझ्या पदाधिकाऱ्यांना सांगितले आहे. एका ठिकाणी काँग्रेस आणि विरोधी पक्षातील काही पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करणार होते.
त्यावेळी मी हे प्रवेश करणारे भाजपमधील तर नाहीत ना रे बाबा, असे आवर्जून विचारले. मित्रपक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांना शिवसेनेत प्रवेश द्यायचा नाही, असे सांगण्यात आल्याचे सांगत त्यांनी या विषयावर पडदा टाकला.