मुंबई : राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणूक निकालानंतर महायुतीत अंतर्गत अस्वस्थता निर्माण झाली आहे. शनिवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी दांडी मारली. तर, मुंबईच्या महापौरपदासाठी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दबाव तंत्र सुरू केले असून, नगरसेवक फोडाफोडीच्या शक्यतेने त्यांनी आपल्या गटाच्या सर्व नगरसेवकांना शनिवारी दुपारी ‘ताज लँडस्’ या पंचतारांकित हॉटेलमध्ये हलविले आहे.
महानगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपने मुंबई व ठाणे वगळता इतर अनेक ठिकाणी शिंदे गटासोबत युती केली नाही. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीतही असाच प्रकार भाजपने केला. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकांमध्ये स्वतः भाजपनेच अजित पवार यांच्याविरोधात दंड थोपटले. तर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडणूक समन्वयाची जबाबदारी नवाब मलिक यांच्याकडे देणार असल्याच्या कारणावरून भाजपने मुंबईतही राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती नाकारली. राज्याच्या सत्तेत एकत्र भाजपने मित्रपक्षांच्या बाबतीत प्रचारात आक्रमक भूमिका घेतली, अशी खंत शिंदे गट व राष्ट्रवादी (अजित पवार गट) कडून व्यक्त केली जात आहे.
मुंबईत शिंदे गटासोबत उमेदवार निवड, जागावाटप आणि प्रचार यंत्रणेच्या वापराबाबत भाजपने जाहीर सभांचा अपवाद वगळता फारसा समन्वय ठेवला नाही. त्यामुळे किमान 50 जागा जिंकण्याची खात्री बाळगलेल्या शिवसेना शिंदे गटाला मुंबईत केवळ 28 जागांवर समाधान मानावे लागले. ठाणे वगळता कल्याण-डोंबिवलीसह काही महत्त्वाच्या महानगरपालिकांमध्ये त्यांना अपेक्षित यश मिळाले नसल्याने शिंदे नाराज झाले आहेत.
पुणे, पिंपरी-चिंचवडसारख्या शहरांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला युती अपेक्षित होती; पण पक्ष विस्ताराच्या भावनेतून त्या दोन्ही शहरांत भाजप स्वबळावर लढला. आमदार महेश लांडगे यांनी केलेली टीका अजित पवार यांना जिव्हारी लागली आहे. तसेच, आपल्या होम ग्राऊंडवर झालेल्या जबरदस्त पीछेहाटीने ते अस्वस्थ झाले आहेत. आगामी जिल्हा परिषदा, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांवेळीही भाजपची अशीच भूमिका असेल, या शक्यतेने दोन्ही उपमुख्यमंत्री भाजपवर नाराज झाले आहेत. या भावनेतून ते दोघेही शनिवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीला आले नाहीत.