पुढारी ऑनलाईन डेस्क : अडीच वर्षांपूर्वी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी माझ्या नावाची घोषणा केली होती. आज मी मुख्यमंत्री म्हणुन त्यांच्या नावाला पाठिंबा दिला आहे, असे स्पष्ट करत दादांना सकाळी आणि सायंकाळच्या शपथविधीचा अनुभव आहे, असा टोलाही काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत लगावला.
महायुतीच्या नेत्यांनी आज राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे सत्ता स्थापनेचा दावा केला. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासह मित्रपक्षांच्या एकूण २३७ आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र राज्यपालांकडे सादर करण्यात आले. यांनंतर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे प्रमुख अजित पवार यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली.
पत्रकार परिषदेत गुरुवारी होणार्या शपथविधी सोहळ्यात देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर आणखी क़ोण शपथ घेणार, असा सवाल एकनाथ शिंदे यांना करण्यात आला. यावर काही वेळातच सर्व स्पष्ट होईल, असे एकनाथ शिंदे यांनी साांगितले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार उद्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार का, असे विचारले असता एकनाथ शिंदे म्हणाले, "संध्याकाळपर्यंत थांबा..."शिंदे यांना प्रत्युत्तर देताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार म्हणाले की, " मी शपथ घेईन, मी थांबणार नाही." अजित पवार यांना प्रत्युत्तर देताना "दादांना (अजित पवार) सकाळी आणि संध्याकाळी शपथ घेण्याचा अनुभव आहे." असा टोला एकनाथ शिंदे यांनी लगावताच पत्रकार परिषदेत हास्याचे फवारे उडाले. अजित पवारांनीही तत्काळ उत्तर देत मागील वेळी सकाळी झालेल्या शपथविधी फार काळ टिकला नाही. मात्र उद्या होणारा शपथविधीनंतर आमची सत्ता सलग पाच वर्ष राहणार आहे, असे सांगितले.
खेळीमेळीच्या वातावरणात महायुतीचे सरकार स्थापन होत आहे. अडीच वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदासाठी माझ्या नावाची शिफारस केली होती. आज मी त्यांची मुख्यमंत्रिपदासाठी शिफारस केली आहे. शिवसेनेने फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदासाठी पाठिंबा दिला आहे. मागील अडीच वर्षात एक टीम म्हणून आम्ही काम करत होतो. मला काय मिळाले. यापेक्षा राज्यातील जनतेला काय देऊ शकतो, याचा विचार करून काम केले. हे सरकार जनतेसाठी काम करणार आहे. महाविकास आघाडीने प्रकल्प थांबविले होते. आम्ही मार्गी लावले. सरकार हे सर्वसामान्यांसाठी असते. अनेक कल्याणकारी योजना मार्गी लावल्या. आतापर्यंतच्या इतिहासात इतक्या कल्याणकारी योजना राबविल्या नव्हत्या. त्या आम्ही राबविल्या याचा आनंद आहे, असे शिंदे म्हणाले.
आम्ही आज राज्यपालांना भेटून सत्ता स्थापनेसाठी पत्र दिले. महायुतीकडून सत्तास्थापनेचा दावा करण्यात आला आहे. आम्हाला उद्या सायंकाळी साडेपाचची शपथविधीसाठी वेळ दिली आहे. शिवसेनेचे प्रमुख म्हणून एकनाथ शिंदे यांनी, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी माझ्या नावाची शिफारस केली. तसे पत्र त्यांनी राज्यपालांना दिले आहे. त्याबद्दल शिंदे यांचे विशेष आभार. तर राष्ट्रवादी अजित पवार यांनीही त्याच आशयाचे पत्र राज्यपालांना दिले आहे. त्यासाठी राज्यपालांनी आम्हाला सत्तास्थापनेचे आमंत्रण दिले आहे,'' असे फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.