मुंबई : ज्येष्ठ नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी आपल्याकडे भाजप नेत्याची एक वादग्रस्त सीडी असल्याचे व ईडीची (ED) नोटीस आली की सीडी वाजवेन, असा इशारा दिला होता. ही सीडी भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याच्या अश्लील चाळ्यांची असल्याचे त्यांनी म्हटले होते. शुक्रवारी यासंदर्भात एका खासगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात विचारले असता त्यांनी तो व्हिडीओ डिलीट झाल्याचा दावा केला आहे.
व्हिडीओ क्लिप आपल्या मोबाईलमधून डिलिट झाली असून ती कशी डिलिट झाली हे आपल्याला कळलेले नाही. या क्लिपमध्ये एक नेता एका मुलीसोबत अश्लील चाळे करीत असल्याचे दृश्य होते, असे एकनाथ खडसे (Eknath Khadse) म्हणाले. ज्या व्यक्तीने आपल्याला ही क्लिप दिली त्याला पैसे देण्यात आले होते. त्याने एक कोटीचे घर घेतले. त्यानेही ही क्लिप डिलिट केली, असे खडसे म्हणाले.
भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मला राज्यपालपदाची ऑफर दिली होती, असा गौप्यस्फोट एकनाथ खडसे यांनी केला. फडणवीस यांनी मनापासून प्रयत्न करेन, असे मुलीची शपथ घेऊन आश्वासन दिले होते, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला आहे. फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्यपालपदाचा हा प्रस्ताव पाच वर्षांपूर्वी दिला होता, असा दावाही त्यांनी केला आहे.
दिल्लीतल्या एका अतिज्येष्ठ नेत्याने मला फोन केल्याने भाजप प्रवेशाचा निर्णय घेतला आणि आणि माझा पक्ष प्रवेश झालाही. मात्र पक्षातर्फे अद्याप जाहीर घोषणा करण्यात आली नसल्याचे खडसे यांनी सांगितले. मी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात असून आता राष्ट्रवादीचे काम करीत राहीन, असेही ते म्हणाले.