गर्भलिंग निदान प्रतिबंध कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होणार file photo
मुंबई

PCPNDT Act implementation : गर्भलिंग निदान प्रतिबंध कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होणार

महिनाभरात जिल्हानिहाय पर्यवेक्षकीय समित्यांची स्थापना; नियमित कार्यशाळा घेण्यात येणार

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : राज्यातील स्त्री-पुरुष लिंग गुणोत्तर प्रमाण वाढविण्यासाठी आणि स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व निदान तंत्रे (गर्भलिंग निदान प्रतिबंध) कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे. येत्या एक महिन्यात जिल्हानिहाय पर्यवेक्षकीय समित्या स्थापन कराव्यात आणि त्यांच्यामार्फत प्रभावी अंमलबजावणीसाठी नियमित कार्यशाळा घेण्याचा निर्णय राज्यस्तरीय पर्यवेक्षकीय मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी राज्यस्तरीय पर्यवेक्षकीय मंडळाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत पीसीपीएनडीटी बाबत आरोग्य विभागामार्फत करण्यात येत असलेल्या कार्यवाहीबाबत आढावा घेण्यात आला.

या बैठकीत नागरी नोंदणी कार्यप्रणालीच्या अहवालानुसार जन्मतः लिंग गुणोत्तर प्रमाणाचा जिल्हानिहाय आढावाही घेण्यात आला. बैठकीच्या आधी आरोग्य सेवा संचालक डॉ. विजय कंदेवाड यांनी आरोग्य विभागामार्फत पीसीपीएनडीटीबाबत करत असलेल्या कार्यवाहीविषयी सादरीकरण केले.

या आढावा बैठकीला आमदार मंजुळा गावित, आमदार सुलभा खोडके, आरोग्य सेवा आयुक्त तथा अभियान संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान डॉ. कादंबरी बलकवडे, महिला आयोगाच्या सदस्य सचिव नंदिनी आवडे, उपसचिव सागर बोंद्रे, सुजित बोरकर, आरोग्य सेवा संचालक डॉ. विजय कंदेवाड, अतिरिक्त संचालक डॉ. संदीप सांगळे, भूपेश सामंत, विधी तज्ञ, अशासकीय संघटनांच्या महिला कार्यकर्त्या डॉ. किरण मोघे, डॉ. सुधा कांकरिया, समाज शास्त्रज्ञ डॉ. निशिगंधा वाड, स्त्रीरोग तज्ञ व प्रसूती शास्त्रज्ञ डॉ. गिता पिल्लई, बालरोगतज्ञ डॉ. अमोल पवार, रेडीओलॉजिस्ट डॉ. अजय जाधव, रेडीओलॉजिस्ट डॉ. राजेंद्र कलंत्री, स्त्रीरोग तज्ञ व प्रसूती शास्त्र डॉ. शोभा मोसेस, स्त्री रोग तज्ज्ञ प्रसाद मगर, वैद्यकीय शिक्षण विभागाचे उपसचिव अनिल अहिरे व्हिडीओ प्रणालीद्वारे उपस्थित होते.

  • भविष्यकाळात मुलींची संख्या वाढविण्यासाठी आणि स्त्री-पुरुष गुणोत्तर प्रमाण वाढविण्यासाठी अधिक गांभीर्याने काम करण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे स्त्री- भ्रूणहत्यासारखे गुन्हेगारी कृत्य करणार्‍यांना आळा घालण्यासाठी व तरुण वर्गात समाजमाध्यमांद्वारे प्रभावी जनजागृती करून सकारात्मक मानसिकतेने काम करावे. ग्रामस्तरावर याविषयी जनजागृती करण्यासाठी आशा स्वयंसेविकांचा सहभाग व गाव पातळीवरील समितीचा सहभाग घ्यावा. त्यासाठी या क्षेत्रात स्वयंप्रेरणेने काम करणार्‍या उत्साही माणसांची टीम तयार करावी. शाळा आणि महाविद्यालय स्तरावर समुपदेशन सत्रे घ्यावी, अशा सूचना यावेळी आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT