मुंबई

ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकरांच्या घरी ‘ईडी’ छापे

दिनेश चोरगे

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : जोगेश्वरी येथील पालिकेच्या भूखंडावर उभारण्यात येणार्‍या 500 कोटी रुपयांच्या पंचतारांकित हॉटेलप्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर चांगलेच अडचणीत सापडले आहेत. याप्रकरणी मंगळवारी सकाळी 'ईडी'च्या अधिकार्‍यांनी वायकर यांच्या जोगेश्वरी येथील निवासस्थानी छापे मारले.

भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या याविषयी तक्रारीनंतर वायकर यांच्यावर कोणत्याही क्षणी 'ईडी' छापे मारेल, अशी अपेक्षा असतानाच ही कारवाई झाली आहे. शरद पवारांचे नातू व आमदार रोहित पवार यांच्या कार्यालयांवर 'ईडी'ने छापे मारल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय वायकर यांच्यावर छापे मारल्याने विरोधी पक्षांना 'ईडी'च्या माध्यमातून सत्ताधारी पक्षांकडून लक्ष्य केले जात असल्याचे आरोप केले जात आहेत.

'ईडी'चे 10 ते 12 अधिकारी सकाळी वायकरांच्या घरी धडकले. त्यानंतर त्यांनी वायकर आणि कुटुंबीयांची झाडाझडती घेत त्यांची कसून चौकशी केली. संध्याकाळपर्यंत ही चौकशी सुरू होती. ऐन निवडणुकीच्या तोंडावरच झालेल्या 'ईडी'च्या कारवाईने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. 'ईडी'चे अधिकारी आल्याचे समजताच ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी वायकर यांच्या निवासस्थानी गर्दी करण्यास सुरुवात केली.

काय आहे प्रकरण?

जोगेश्वरी येथील मातोश्री क्लबच्या शेजारी असलेल्या राखीव भूखंडावर वायकर पंचतांराकित हॉटेल बांधणार होते. त्यासाठी पालिकेने सुरुवातीला परवानगीही दिली होती. मात्र, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी या भूखंडामध्ये तसेच तेथे बांधण्यात येणार्‍या हॉटेलमध्ये 500 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. त्यानंतर पालिकेने कागदपत्रांची छाननी करून दिलेली परवानगी रद्द केली. त्यासंदर्भात सोमय्या यांनी 'ईडी' आणि आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे तक्रार नोंदवली होती. या तक्रारीची गंभीर दखल घेऊन आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने वायकर यांना चौकशीसाठी बोलावले होते. आर्थिक गुन्हे शाखेने वायकरांविरोधात तक्रार दाखल करून घेतली होती. या तक्रारीच्या आधारेच मंगळवारी 'ईडी'च्या अधिकार्‍यांनी वायकर यांच्या घरी छापे टाकले.

हिशेब द्यावा लागेल : सोमय्या

दरम्यान, या छाप्यानंतर सोमय्या यांनी ठाकरे गटावर जोरदार टीका करत आता 'हिसाब तो देना पडेगा,' असा टोला लगावला आहे. उद्धव ठाकरेंचे पार्टनर रवींद्र वायकर आणि त्यांच्या इतर नेत्यांनी कोरोनामध्ये लुटण्याचे, भ्रष्टाचाराचे धंदे केले. यासंदर्भात एकूण 39 तक्रारी आपण केल्या होत्या. वायकर यांनी बेकायदेशीररीत्या हॉटेलची परवानगी घेतली होती. त्यावर शिंदे सरकारने कारवाई केली असून, उच्च न्यायालयाने त्याला मान्यता दिली, असल्याचे सोमय्या म्हणाले. उद्धव ठाकरेंच्या अलिबाग येथील 19 बंगल्यांमध्ये भागीदार वायकरच आहेत. ज्यांनी नोटाबंदीमध्ये शेकडो कोटी रुपयांचा घोटाळा केला ते चंद्रकांत पटेल हेसुद्धा वायकरांचे भागीदार आहेत. एवढे त्यांनी घोटाळे केले आहेत, तर त्याचा आता त्यांना हिशेब द्यावाच लागणार आहे, असेही सोमय्या म्हणाले.

शिंदे गटाचा ठाकरेंवर निशाणा

आमदार रवींद्र वायकर यांच्या घरी 'ईडी'ने टाकलेल्या छाप्यानंतर शिंदे गटाने ठाकरे गटावर निशाणा साधला आहे. वायकर हे छोटा मोहरा आहेत; पण त्यांच्याशी संबंधित मोठा मोहराही लवकरच गळाला लागेल, अशी शक्यता शिंदे गटाचे प्रवक्ते, आमदार राजेश शिरसाट यांनी वर्तवली आहे. वायकरांचा इतका मोठा कारभार पाहिला, तर इतके सहजासहजी त्यांनी एकट्याने केलेले नाही. त्यांच्याबरोबर कोण असतील तेसुद्धा 'ईडी'च्या 'रडार'वर येतील, असे मला वाटते. त्यामुळे ही सूडबुद्धीने कारवाई झालेली नाही. उद्या आमच्यावर वेळ येणार नाही का, असा सवाल उपस्थित करत या कारवाया कायदेशीर असल्याचे त्यांनी सांगितले. नाहक कोणताही पुरावा नसताना कुठलीही केंद्र किंवा राज्य सरकारची तपास यंत्रणा अशी कारवाई करीत नाही. त्यामुळे उगाचच विरोधी पक्षात आहे म्हणून अशी आपल्यावर कारवाई झाली तर त्याला राजकीय रंग देण्याची आवश्यकता नाही, असे उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई म्हणाले.

'ईडी'च्या कचाट्यातील आणखी एक नेता

वायकरांवरील कारवाईच्या निमित्ताने ठाकरे गटाचा आणखी एक नेता 'ईडी'च्या कचाट्यात सापडला आहे. यापूर्वी खासदार संजय राऊत, नेते अनिल परब, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर हे 'ईडी'च्या रडारवर होते. यापैकी 'ईडी'ने राऊत यांना अटक केली होती. त्यांना तीन महिने तुरुंगवासात राहावे लागले होते. त्यानंतर वायकर यांचे नाव चर्चेत होते. वायकर हे लवकरच तुरुंगात जातील, असा इशारा सोमय्या यांनी यापूर्वी अनेकदा दिलेला आहे. मात्र, आज 'ईडी'च्या पथकाने वायकर यांच्या घरावर छापे टाकून निर्णायक कारवाईच्या द़ृष्टीने पाऊल टाकले आहे.

शिवसेनेत फूट पडण्याआधी खासदार भावना गवळी, स्थायी समितीचे माजी सभापती यशवंत जाधव, आमदार प्रताप सरनाईक, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उजवा हात म्हणून ओळखले जाणारे सचिन जोशी यांनाही 'ईडी'च्या नोटिसी गेल्या होत्या. मात्र, राज्यात सत्तांतरानंतर भाजपसोबत गेलेल्या शिवसेना नेत्यांविरुद्धची कारवाई थंडावली आहे.

उद्धव ठाकरेंचा प्रतिक्रियेस नकार

या विषयावर उद्धव ठाकरे यांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी या विषयावर काहीही बोलण्यास नकार दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी यावर केंद्र सरकारला धारेवर धरले आहे. जोवर केंद्रात हे सरकार आहे तोवर असेच प्रकार होत राहतील, असे पवार म्हणाले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT