Actor Shekhar Suman File Photo
मुंबई

ED FEMA investigation: अभिनेता शेखर सुमनशी संबंधित निर्मात्याविरोधात ईडीची मोठी कारवाई; FEMA अंतर्गत चौकशी सुरू

ED Investigation Dharmesh Sangani: अभिनेता शेखर सुमन यांच्याशी संबंधित मुंबईतील एका चित्रपट निर्मात्याविरुद्ध अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) परकीय चलन व्यवस्थापन कायद्यांतर्गत चौकशी सुरू केली आहे.

पुढारी वृत्तसेवा

ED FEMA investigation Dharmesh Sangani

मुंबई: अभिनेता शेखर सुमन यांच्याशी संबंधित मुंबईतील एका चित्रपट निर्मात्याविरुद्ध अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) परकीय चलन व्यवस्थापन कायद्यांतर्गत चौकशी सुरू केली आहे. परदेशातील अघोषित मालमत्ता, विदेशी बँक खाती आणि परकीय चलन व्यवहारांमधील कथित अनियमिततेप्रकरणी ईडीने मुंबईतील विविध ठिकाणी छापे टाकत महत्त्वाचे पुरावे जप्त केल्याचा दावा केला आहे.

ईडीने गुरुवारी कलानी इम्पेक्स लिमिटेड आणि कंपनीचे संचालक धर्मेश संगानी, त्यांची पत्नी रंजिता संगानी व नरेंद्र संगानी यांच्याशी संबंधित ठिकाणांवर छापे टाकले. धर्मेश संगानी हे शेखर सुमन यांनी सुरू केलेल्या एका फिल्म अकादमीचे सह-संस्थापक आहेत. सध्या ही चौकशी केवळ संगानी कुटुंबीय आणि त्यांच्या कंपनीपुरतीच मर्यादित असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

अघोषित परदेशी कंपन्या आणि बँक खात्यांचे पुरावे

ईडीच्या माहितीनुसार, झडतीदरम्यान धर्मेश संगानी यांच्या नावावर परदेशात अघोषित कंपन्या आणि विदेशी बँक खाती असल्याचे पुरावे मिळाले. ही माहिती त्यांनी आयकर विवरणपत्रात नमूद केली नसल्याचा आरोप आहे. या कंपन्यांमधील निधीचा स्रोत, मालकीची रचना आणि आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी सुरू आहे.

मोबाईल १३व्या मजल्यावरून फेकल्याचा आरोप

झडतीदरम्यान पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने धर्मेश संगानी यांनी आपला मोबाईल फोन इमारतीच्या १३व्या मजल्यावरून खाली फेकल्याचा आरोप ईडीने केला आहे. तपास अधिकाऱ्यांनी तो मोबाईल नंतर जप्त केला असून, पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांकडे तक्रारही दाखल करण्यात आली आहे.

निर्यात रकमेतील कोट्यवधींची अनियमितता

ईडीच्या म्हणण्यानुसार, 'कलानी इम्पेक्स'ने 'फॉरेन एक्स्चेंज मॅनेजमेंट (एक्सपोर्ट ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस) रेग्युलेशन्स, २०१५' आणि रिझर्व्ह बँकेच्या 'मास्टर डिरेक्शन ऑन एक्सपोर्ट ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस' अंतर्गत निर्धारित मुदतीत कोट्यवधी रुपयांची निर्यात रक्कम भारतात आणली नसल्याचे समोर आले आहे. तसेच, ही मुदत वाढवून घेण्यासाठी कंपनीने अधिकृत बँका किंवा रिझर्व्ह बँकेकडे कोणताही अर्ज केला नसल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

'डिफॉल्टर' निर्यातदारांच्या यादीत कंपनीचा समावेश

ईडीने सांगितले की, मे २०२६ मध्ये सीमाशुल्क विभागाने जाहीर केलेल्या सार्वजनिक नोटिशीत कलानी इम्पेक्सचा 'डिफॉल्टर' (नियम न पाळणाऱ्या) निर्यातदारांच्या यादीत केला होता. झडतीदरम्यान, अधिकाऱ्यांना जून २०२५ मध्ये अमेरिकेच्या 'कस्टम्स अँड बॉर्डर प्रोटेक्शन' विभागाने जप्त केलेल्या सुमारे ३ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स किमतीच्या दागिन्यांशी संबंधित कागदपत्रे सापडली. ही जप्ती तस्करी केलेला माल आणि बनावट ट्रेडमार्क असलेल्या संशयास्पद वस्तूंच्या कथित प्रकरणाशी संबंधित होती. "जप्त केलेला माल आणि कंपनीने भारतातून केलेली निर्यात यांच्यातील संबंध तपासले जात आहेत," असे एजन्सीने म्हटले.

लंडन विमानतळावरही झाली होती कारवाई

ईडीच्या म्हणण्यानुसार, सप्टेंबर २०१६ मध्ये लंडनमधील हिथ्रो विमानतळावर धर्मेश सांगाणी यांना अडवण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्या ताब्यातील ७.४१ किलो कमी मूल्य दाखवलेले सोन्याचे दागिने जप्त करण्यात आल्याची नोंदही तपासात समोर आली आहे. ईडीने झडतीदरम्यान जप्त केलेली कागदपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांची तपासणी सुरू केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT