मुंबई : मुंबई शहर व उपनगरात यंदा पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाला गणेशभक्तांनी प्राधान्य दिले. गणेशोत्सवात सुमारे 1 लाख 97 हजार 114 गणेशमूर्तींचे विसर्जन झाले. यापैकी 98 टक्केपेक्षा अधिक घरगुती गणपतींचे कृत्रिम तलावात विसर्जन करण्यात आले.
अनंत चतुर्दशी दिवशी 33 हजार 923 गणेशमूर्तींचे विसर्जन झाले. यातील 30 हजार 630 मूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन करण्यात आले. तर अवघ्या 3 हजार 293 मूर्तींचे समुद्र व अन्य नैसर्गिक तलावात विसर्जन झाले.
मुंबई महानगरपालिकेने यावर्षी पीओपी मूर्तीवर बंदी घातली होती. मात्र न्यायालयाने पीओपी गणेशमूर्ती बनवण्यास परवानगी दिली, मात्र विसर्जनासाठी नियमावली आखून दिली. यात सहा फुटांपर्यंतच्या मूर्ती कृत्रिम तलावातच विसर्जन करणे बंधनकारक केले. त्यानुसार मुंबई महापालिकेने व्यवस्था केली. गणेश मूर्तींचे विसर्जन वेळेत व्हावे यासाठी यंदा तब्बल 290 कृत्रिम तलाव उभारण्यात आले होते. गणेशभक्तांनीही याला प्रतिसाद दिला.
यावर्षी सुमारे 1 लाख 97 हजार 114 गणेशीमूर्तींचे विसर्जन झाले. यात 1 लाख 81 हजार 375 घरगुती तर 10 हजार 148 सार्वजनिक गणेश मूर्तींचे विसर्जन झाले. यापैकी 98 टक्केपेक्षा जास्त घरगुती गणपतींचे कृत्रिम तलावात विसर्जन करण्यात आले. तर सार्वजनिक म्हणजेच मोठ्या मूर्तींचे समुद्र व नैसर्गिक तलावात विसर्जन करण्यात आले. ही संख्या सरासरी साडेपाच हजारांपेक्षा जास्त होती.
पर्यावरणपूरक श्रीगणेशोत्सवासाठी केलेल्या जनजागृतीला यंदा मुंबईकरांनी प्रतिसाद दिला. त्यामुळे कृत्रिम विसर्जनस्थळांवर मूर्ती विसर्जित करण्याचा ओघ वाढल्याचा दावा पालिकेने केला आहे.
508 मेट्रिक टन निर्माल्य संकलित
गणेशोत्सवादरम्यान निर्माल्यांचे संकलन करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून विशेष प्रयत्न करण्यात आले. सार्वजनिक मंडळांकडून योग्यप्रकारे निर्माल्य संकलित केल्यानंतर त्यावर प्रक्रिया करण्यात येत आहे. मुंबईतील विविध विसर्जनस्थळी 594 निर्माल्य कलश आणि 307 निर्माल्य वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती. त्याद्वारे 508 मेट्रिक टन निर्माल्य संकलित करण्यात आल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.